बंद

    चित्ररथांतून उलगडली महाराष्ट्राच्या विकासाची गाथा

    प्रकाशित तारीख: January 26, 2019

    महान्यूज

    दि. 26 जानेवारी, 2019

    चित्ररथांतून उलगडली महाराष्ट्राच्या विकासाची गाथा

    मुंबई, दिनांक 26 : प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. शिवाजी पार्क येथे झालेल्या या सोहळ्यात विविध विभागाच्या चित्ररथांच्या माध्यमातून राज्याच्या विकासाची गाथा उलगडण्यात आली. यावेळी चित्ररथांनी केलेल्या संचलनाने उपस्थितांची मने जिंकून घेतली. विशेषतः एमएमआरडीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या प्रतिकृतीचा चित्ररथ सोहळ्याचा आकर्षण ठरला.

    आदिवासी विभागाने राज्याच्या आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारा चित्ररथ आणि त्याचबरोबर आदिवासी नृत्य करण्याऱ्या मुला मुलींच्या पथकाला प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. जसजसे चित्ररथ संचलन करत आणि सोबतचे पथक नृत्य करत पुढे येत होते तसतसा टाळ्यांचा आवाज वाढत जात होता. सामाजिक न्याय विभागाने सादर केलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी निगडित लंडनस्थित निवासस्थान तसेच राज्यातील अन्य स्थळांचा विकास याबाबत सुरू असलेल्या कार्यवाहीची माहिती देणारा चित्ररथ, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने मुंबईची स्वच्छता आणि गलिच्छ वस्ती निर्मूलनाच्या संकल्पनेवर आधारित चित्ररथ सादर केला. मुंबई पोलिसांच्या बलस्थानांची झलक चित्ररथातून दाखविण्यात आली. म्हाडाचा गृहनिर्माण योजनांबाबतचा चित्ररथ, पर्यावरण विभागाचा प्लास्टिक बंदीचा प्रचाररथ, वनविभागाचा कांदळवन क्षेत्रात वाढ, वृक्षलागवड मोहिमेचा प्रचार करणारा चित्ररथही वैशिष्ट्यपूर्ण ठरला.

    निवडणूक विभागाने सादर केलेल्या मतदार जागृतीच्या चित्ररथानेही लक्ष वेधून घेतले. या चित्ररथामध्ये ईव्हीएम यंत्रे आणि व्हीव्हीपॅट यंत्रांच्या प्रतिकृती मांडण्यात आल्या होत्या. समाजाच्या प्रत्येक घटकाला वीज पुरविण्याची महावितरणची कटिबद्धता आणि ई-वाहनांबाबत जनजागृती चित्ररथाच्या माध्यमातून करण्यात आली. कृषी विभागाच्या चित्ररथातून राज्याच्या कृषिविकासाचे दर्शन घडविण्यात आले. रोजगार हमी योजना, जलसंधारण विभागाचा चित्ररथही उपस्थितांच्या आकर्षणाचा विषय ठरला.