ग्रंथालयाचे डिजिटलायझेशन, ई – लायब्ररी सुरु होणे आवश्यक – राज्यपाल चे. विद्यासागर राव
वृ.वि.1379
दि. 26 जून, 2019
राजभवनात ‘मायबोली’ लघुपटाचे प्रदर्शन
ग्रंथालयाचे डिजिटलायझेशन,ई – लायब्ररी सुरु होणे आवश्यक
– राज्यपाल चे. विद्यासागर राव
मुंबई दि. २६ : आजचे युवक पुस्तक न वाचता ई बुक्स वाचणे जास्त पसंद करतात. त्यामुळेच आगामी काळात अधिकाधिक पुस्तकांचे डिजिटलायझेशन होणे आवश्यक आहे. राज्य शासनाने सर्व शासकीय ग्रंथालयाचे डिजिटलायझेशन करण्याचा प्रकल्प हाती घेण्याबरोबरच मराठी डिजिटल ई लायब्ररी सुरु करणे आवश्यक असल्याचे राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी सांगितले.
आज राजभवन येथे पल्लवी फाऊंडेशन यांनी निर्मिती केलेल्या ‘मायबोली’ या लघुपटाचे प्रदर्शन करण्यात आले. यावेळी विधानसभा उपाध्यक्ष विजय आवटी, पल्लवी फाऊंडेशनचे संस्थापक भाऊ कोरगांवकर यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक उपस्थित होते. पल्लवी फाऊंडेशनमार्फत मायबोली या लघुपटाची निर्मिती करण्यात आली असून या लघुपटामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या मातृभाषेतून शिक्षण घ्यावे असा संदेश देण्यात आला आहे.
राज्यपाल श्री. राव यावेळी म्हणाले, वाढत्या इंग्रजी भाषेच्या आग्रहामुळे मराठीसह सर्वच स्थानिक भाषांना इंग्रजी भाषेपुढे टिकाव धरुन ठेवणे कठीण बनत चालले आहे. स्थानिक भाषेमधील शाळा इंग्रजी भाषेच्या शाळांमुळे बंद पडत चालल्या असून ही बाब चिंताजनक आहे. महाराष्ट्रात मराठी शाळा, तामिळनाडूमध्ये तामिळ शाळा तर तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमधील तेलगू शाळा बंद पडत आहेत अशीच स्थिती इंग्रजी शाळांमुळे इतर राज्यांमध्ये आहे. आज आपण जेव्हा इंग्रजी ही जागतिक भाषा म्हणून महत्वाची मानतो त्याचवेळी आजचे विद्यार्थी आणि युवक आपल्या मातृभाषेत बोलत नाही, वाचत नाहीत ही खेदजनक बाब आहे. आज काही इंग्रजी शाळांमध्ये तर मुलांनी घरीसुध्दा मातृभाषेत न बोलता इंग्रजीतच बोलावे असा आग्रह धरला जात आहे.
महाराष्ट्राची लोकसंख्या ही आज जर्मनी, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्याइतकी आहे. जगातल्या प्रमुख 20 भाषांमध्ये आज बंगाली, तेलगू, तामिळ, हिंदी आणि मराठी या भाषा आहेत. मराठी आणि संस्कृत या भाषांना इतर देशात प्रचंड मागणी असून जर्मनीतल्या 14 विद्यापीठांमध्ये संस्कृत, शास्त्रीय व आधुनिक भारतीय ज्ञान शिकविले जात आहे. तर अमेरिका, इटली, पोलंड, ऑस्ट्रिया, ऑस्ट्रेलिया आणि युरोपसारख्या देशांमध्येही संस्कृत भाषा शिकविली जात आहे. जर्मनीमधल्या मॅक्स मुलेर भवनमध्ये संस्कृत आणि मराठी संस्थांमध्ये या दोन्ही भाषांचे लिहिण्याचे आणि बोलण्याचे अल्प मुदत अभ्यासक्रम शिकविले जातात, त्याच धर्तीवर येथे सुध्दा असे प्रयोग होणे आवश्यक असल्याचे राज्यपाल श्री. राव यांनी आपल्या भाषणात नमूद केले.
राज्यपाल मराठी भाषा टिकून राहावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सांगून श्री. राव म्हणाले, मातृभाषा ही एका नदीसारखी आहे. आपल्या मातृभाषेतील संवादामुळे आपण आपले विचार आणि भाव दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवू शकतो. मातृभाषेमुळे दोन व्यक्तींमधला संवाद अधिक दृढ होतो त्यामुळे मातृभाषा टिकून राहणे, समृध्द होणे आवश्यक आहे. आपले मूल्य, आदर्श आणि व्यक्तिमत्व मातृभाषेमुळेच समृध्द होतात. मातृभाषेतून आपण आपले अनुभव, ज्ञान, परंपरा आणि संस्कृती चांगल्या पध्दतीने पुढील पिढीला देऊ शकतो. मातृभाषेचे संवर्धन करताना आपण सर्वांनी पुढाकार घेणे जितके आवश्यक आहे तितकेच मातृभाषेचा दैनंदिन वापरात उपयोग करण्यासाठी आग्रही असणे आवश्यक आहे. आज दहावीनंतर विद्यार्थी फ्रेंच, जर्मनी आणि मंडारियन अशा परदेशी भाषा शिकतात. या भाषांमुळे विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळतील असे त्यांना वाटते पण मग अशा वेळी मराठी किंवा इतर स्थानिक भाषा उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांनी निवडल्यास यामध्ये चांगले गुण कसे मिळतील हे आपण शोधणे आवश्यक आहे.