बंद

    कौशल्यपूर्ण प्रशिक्षणामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना व्यवसाय संधी – राज्यपाल

    प्रकाशित तारीख: May 7, 2019

    वृ.वि.988

    वैशाख -12/1941 (दु.3.10 वा.)

    महान्यूज

    दि. 7 मे, 2019

    मुंबई/राज्यपाल/कौशल्य प्रशिक्षण

    प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रे वितरित कौशल्यपूर्ण प्रशिक्षणामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना व्यवसाय संधी.

    – राज्यपाल

    मुंबई, दि. 7 : ज्येष्ठांसाठी आरोग्यसेवा देणाऱ्या कौशल्यपूर्ण प्रशिक्षणामुळे आदिवासी विभागातील विद्यार्थ्यांना व्यावसायाच्या सुवर्ण संधी देशातच नव्हे तर विदेशातही उपलब्ध होणार आहेत. रूग्णसेवा करताना त्यांचा आत्मविश्वास वाढून समाजाच्या मुख्य धारेत येण्यास सहकार्य लाभणार आहे, असे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी सांगितले.

    आदिवासी विकास विभाग आणि ग्रॅण्डेज सर्व्हसिेस यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी विद्यार्थ्यांना तीन महिन्याचा कौशल्यपूर्ण प्रमाणपत्र शिक्षणक्रम उपलब्ध करून देण्यात आला. यशस्विरित्या शिक्षणक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना राजभवन येथे राज्यपालांच्या हस्ते आज प्रमाणपत्र आणि नोकरीत रूजू होण्याचे पत्र सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. यावेळी राज्यपाल बोलत होते.

    राज्यपाल म्हणाले, आदिवासी विकास विभागाने नाशिक, ठाणे आणि देवळाली अशा दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण उपलब्ध करून देणे ही अभिनंदनीय बाब आहे. या विद्यार्थ्यांनी यापुढेही विविध भाषा, नर्सिंग क्षेत्रातील ज्ञान प्राप्त केल्यास त्यांना नोकरीच्या अधिकाधिक चांगल्या संधी प्राप्त होऊ शकतात. राज्यातील अनेक ज्येष्ठांसाठी आरोग्यसेवकांची मागणी वाढत आहे. देशाची लोकसंख्या पाहता भविष्यात २०५० मध्ये वृद्धांची संख्या ३४ करोड इतकी असणार आहे. यामुळे भविष्यात या क्षेत्रात नोकरीच्या संधी देशातच नाही तर विदेशातही मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे सांगून, राज्यपाल यांनी आदिवासी विकास विभाग आणि यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

    आदिवासी विकास विभागाच्या सचिव श्रीमती मनीषा वर्मा यांनी यावेळी या शिक्षणक्रमाची माहिती देताना सांगितले, आदिवासी विकास विभाग आदिवासींच्या आणि त्यांच्या मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न करीत आहे. या मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना कौशल्यपूर्ण शिक्षणक्रम देऊन त्यांना व्यावसायाची संधी प्राप्त करून दिली आहे. ठाणे, नाशिक आणि देवळाली या भागातील २४ विद्यार्थ्यांची नॅशनल वोकॅशनल फ्रेमवर्क यांच्या मार्गदर्शनानुसार केअर गिव्हर या अभ्यासक्रमासाठी उमेदवारांची निवड करण्यात आली होती. या प्रशिक्षणादरम्यान त्यांना एक महिना आंतरवासिता म्हणून देवळाळी येथील रूग्णालयात प्रात्यक्षिक करण्याची संधी प्राप्त करून दिली.

    ग्रॅण्डेज सर्व्हिसेस प्रा.लि.च्या सहकार्याने सुरू केलेल्या या प्रशिक्षणानंतर या विद्यार्थ्यांना नोकरीची संधीही प्राप्त करून दिली आहे. भविष्यात जास्तीत जास्त आदिवासी विभागातील विद्यार्थ्यांना नोकरीची संधी प्राप्त करून देणारे कौशल्यपूर्ण शिक्षणक्रम देण्यात येणार असल्याची माहितीही श्रीमती वर्मा यांनी यावेळी दिली.

    या प्रशिक्षणात अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांना प्रात्यक्षित ज्ञान देण्यात आले. ज्येष्ठ रूग्णांची स्वच्छता, त्यांचा आरोग्य दिनक्रम, तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध करणे आणि रूग्णांशी संवाद साधणे अशा व इतर प्रकारचे प्रशिक्षण या अभ्यासक्रमात देण्यात आले. हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना रूग्णालय, सामाजिक संस्था तसेच परदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याची माहितीही श्रीमती वर्मा यांनी यावेळी दिली.