बंद

  २७.०१.२०२० वैद्यकीय सुविधांचा लाभ वंचित घटकांपर्यंत पोहोचवा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

  प्रकाशित तारीख: January 27, 2020

  नागपूर, दि. 27: वैद्यकीय क्षेत्रात दररोज नवनविन संशोधन होत असून, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा परिचय होत आहे. वैद्यकीय व्यावसायिकांनी हे संशोधन व तंत्रज्ञान सर्वसामान्य गरजूंपर्यंत पोहोचविण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेने काम करण्याचे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
  लोकमत टाईम्स एक्सलन्स इन हेल्थकेअर अवॉर्डस 2020 चे वितरण आज राज्यपालांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. विदर्भाच्या वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनिय कार्याबद्दल विविध धन्वतंरीना राज्यपालांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर, प्रसिद्ध वैद्यक डॉ. के. एच संचेती, माजी खासदार विजय दर्डा, डॉ. संजीव जुनेजा, डॉ. अविनाश भोंडवे यासह परीक्षक मंडळाचे प्रमुख डॉ. एस. एन. देशमुख, डॉ. राजीव खंडेलवाल व्यासपिठावर उपस्थित होते.
  वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनाचा व अत्याधुनिक उपचार पद्धतीमध्ये आमुलाग्र बदल होत असतानाच वैद्यकीय सुविधा अधिक खर्चिक झाल्या आहेत. या सुविधा सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता व्यक्त करताना राज्यपाल म्हणाले, नागपूरपासून या सुविधांचा लाभ गरिबांपर्यंत पोहोचविण्याला सुरुवात करावी. वैद्यकीय व्यवसायातून मिळणा-या उत्पन्नापैकी डॉक्टरांनी काही पैसे हे गरजू व दुर्बलांच्या सेवेसाठी खर्च केल्यास दु:खी माणसाची सेवा केल्याचा आनंद मिळतो. रुग्णांना वेदनेपासून मुक्त करून समाधान द्या, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
  प्रारंभी माजी खासदार विजय दर्डा यांनी स्वागत करून वैद्यकीय क्षेत्रातील सामाजिक बांधीलकीला स्वीकारत उल्लेखनिय कार्य करणा-या डॉक्टरांना प्रोत्साहन देण्यासाठी हे पुरस्कार सुरू केल्याची भावना मांडली. विविध शाखेतील एकूण 17 डॉक्टरांना गौरविण्यात आले. यामध्ये जीवनगौरव पुरस्कारांमध्ये नागपुरातील डॉ. बी. जे सुभेदार, डॉक्टर शोभा ग्रोव्हर तसेच उल्लेखनिय योगदानाबददल डॉ. सुधीर बाभुळकर, डॉ. मदन कापरे, डॉ. श्रीकांत मुक्केवार, डॉ. जय देशमुख व गोंदिया येथील डॉ. देवाशिष चॅटर्जी यांना राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
  नेत्ररोग विभागात डॉ. जुगल चिराणीया (अकोला), सुपर स्पेशालिटी क्षेत्रात डॉ. प्रमोद मुंद्रा (नागपूर), बालरोग विभागात डॉ. नरेंद्र राठी (अकोला), औषधे व संलग्न सेवा डॉ. अशोक बावस्कर (खामगाव), स्त्रीरोग विभागात डॉ. स्नेहा भुया (यवतमाळ), रेडीयोलॉजी विभागात डॉ. सुधीर नेरळ (नागपूर), शस्त्रक्रिया विभागात डॉ. चंद्रशेखर बांडे (नागपूर), फॅमिली फिजीशीयन डॉ. अशोक वासलवार (चंद्रपूर), सुपर स्पेशालिटी (शस्त्रक्रिया) विभागात डॉ. क्षीतिज पाटील (अमरावती), रुग्णालय विभागात ओझोन हॉस्पिटल (अकोला) यांना स्मृतीचिन्ह देवून पुरस्कृत करण्यात आले.
  संचलन श्वेता शेलगावकर तर आभार डॉ. राजीव खंडेलवाल यांनी मानले.
  *****