बंद

  ११.०२.२०२० जलसंवर्धनाच्या कामात नागरिकांनी सहभागी होण्याचे राज्यपालांचे आवाहन

  प्रकाशित तारीख: February 11, 2020

                                                                   जलसंवर्धनाच्या कामात नागरिकांनी सहभागी होण्याचे राज्यपालांचे आवाहन

  औरंगाबाद, दि. 11 : पर्यावरणाचा असमतोलपणा व मराठवाड्यासारख्या अवर्षण भागात पाण्याची आवश्यकता लक्षात घेऊन प्रत्येक नागरिकाने जलसंवर्धनाच्या कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

  डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील जलदूत संस्थेने लोकसहभागातून बांधलेल्या फेरोसिमेंट तंत्रज्ञान बंधाऱ्याचे जलपूजन व लोकार्पण सोहळा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

  यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रमोद येवले, कुलसचिव साधना पांडे, नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचे संचालक प्रा.अश्विनीकुमार नांगिया, गरवारे प्रा.लि.चे तांत्रिक संचालक अनिल भालेराव, जलदूत संस्थेचे अध्यक्ष किशोर शितोळे यांच्यासह जलदूत संस्थेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  विद्यापीठाच्या सहयोगातून जलदूत संस्थेने केलेल्या उपक्रमाचे कौतुक करीत श्री.कोश्यारी म्हणाले की, जलसंवर्धनाचे काम हे एकट्याचे नसून या कामात सर्वांच्या सहभागाची तसेच विद्यार्थ्यांच्या परिश्रमाची आवश्यकता आहे. जलदूतांनी या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत फेरोसिमेंट बंधाऱ्याचे काम पोहोचविल्यास खऱ्या अर्थाने हा उपक्रम यशस्वी होईल. तसेच या सारखे उपक्रम विद्यापीठातून प्राथमिक शाळेपर्यंत पोहोचविण्याची खरी गरज असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.

  कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री.कोश्यारी यांनी उपस्थितांना जलप्रतिज्ञा देऊन विद्यापीठाचे कुलगुरूंना बंधारा हस्तांतरणाचे पत्र दिले. तसेच जलदूत प्रकल्पाच्या पुस्तिकेचे विमोचनही यावेळी करण्यात आले. यानंतर जलदूत प्रकल्पाचे अध्यक्ष श्री.शितोळे यांनी या प्रकल्पाची माहिती देताना सांगितले की, फेरोसिमेंट बंधारा कमी खर्चात आणि कमी कालावधीत होणारा परंतु अधिक पाणी साठवण क्षमता असलेला बंधारा असल्याने शेतकऱ्यांनी हा बंधारा आपल्या शेतात केल्यास नक्कीच फायदा होईल. या बंधाऱ्यामुळे विद्यापीठ परिसरातील विहिरींचे पुर्नभरण झाले असल्याची माहिती त्यांनी दिली.