बंद

  स्वामी विवेकानंदांचे जीवन, कार्य अभ्यासणे तरुणांसाठी प्रेरणादायी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

  प्रकाशित तारीख: September 12, 2019

  महान्युज

  स्वामी विवेकानंदांचे शिकागो भाषणाचा 126 वा वर्धापन दिन

  स्वामी विवेकानंदांचे जीवन, कार्य अभ्यासणे तरुणांसाठी

  प्रेरणादायी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

  मुंबई, दि. 12 – स्वामी विवेकानंद म्हणजे भारतीय संस्कृतीचे मुर्तीमंत रुप होते. त्यामुळे त्यांचे जीवन हे तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. ते अभ्यासण्यासाठी तरुणांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

  स्वामी विवेकानंदांच्या शिकागो भाषणाच्या 126 व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रकवि रामधारी सिंह ‘दिनकर’ मेमोरियल ट्रस्टच्यावतीने आयोजित ‘राष्ट्रप्रेम उत्सव’ या निमंत्रितांच्या मेळाव्यात ते बोलत होते. मुंबई विद्यापीठाच्या कलिना प्रांगणात बुधवारी हा कार्यक्रम संपन्न झाला.

  राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी आपल्या भाषणाची सुरवात मराठीतून केली. तसेच उपस्थितांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या. ते म्हणाले, ‘भारतीय संस्कृतीची महत्ता स्वामी विवेकानंद यांनी साता-समुद्रापार पोहचवली. आपल्या भाषणाने त्यांनी अमेरिकेतील नागरिकांचीही जिंकली. त्यांनी आपल्या विद्वत्तेने सर्वोच्च स्थान पटकाविले होते. त्यांनी केवळ ज्ञानोपासनाच नाही, तर शरीर स्वास्थ्याबाबतही योग साधनेचे महत्त्व जगभर पोहचविले. त्यांनी रामकृष्ण मिशनच्या माध्यमातून शाळा, रुग्णालयांचीही स्थापना केली. या विविध सेवांच्या माध्यमातून त्यांनी देशाच्या अस्मितेचे जतन केले. त्यामुळेच स्वामी विवेकानंद यांचे जीवन आणि कार्य अनेक रुपांनी प्रेरणादायी आहे. ते अभ्यासणे तरुणांसाठी प्रेरणादायीच ठरेल.’

  उत्सवात ‘स्वामी विवेकानंद’ यांच्या जीवनावर निर्माते-दिग्दर्शक मुजीब खान यांनी नाटक सादर केले. कार्यक्रमास मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर, प्र- कुलगुरू रविंद्र कुलकर्णी, राष्ट्रकवि रामधारी सिंह ‘दिनकर’ मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष नीरज कुमार, डॉ. सुभाष चंद्र राय, आर.पी. सिंह, रामकृष्ण मिशनचे सचिव स्वामी सत्यदेवानंद , हिंदी विभागाचे सेवानिवृत्त प्रमुख प्रा.रतनकुमार पांडे, प्रकाश सीलम, आदी उपस्थित होते.