बंद

    स्वच्छ, सुंदर भारत बनविण्यासाठी सर्वानी सहभागी होण्याचे राज्यपालांचे आवाहन

    प्रकाशित तारीख: October 2, 2018

    महान्यूज

    स्वच्छ, सुंदर भारत बनविण्यासाठी सर्वानी सहभागी होण्याचे राज्यपालांचे आवाहन

    मुंबई. दि. 2. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये स्वच्छ भारत अभियानाचा शुभारंभ केला असुन आज आपण महात्मा गांधींच्या 150 व्या जंयती वर्षामध्ये प्रवेश केला आहे. स्वच्छ भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी राज्यातील शासकीय, बिगर शासकीय, खाजगी संस्था तसेच शाळा, महाविद्यालये व विद्यापीठांनी हे अभियान अधिक नेटाने राबवावे, असे आवाहन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज केले.

    महात्मा गांधींनी प्रत्येक गांव आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर होण्यासाठी ‘स्वावलंबना व स्वपरीपालना’चा मंत्र दिला होता. ग्राम पंचायतींच्या सशक्तीकरणासाठी 73 वीं घटनादुरूस्ती करण्यात आली होती. ग्रामपंचायतीना 29 अधिकार देणे अपेक्षित असुन ते सर्व अधिकार दिल्यास महात्मा गांधींचे ग्राम स्वराज्याचे स्वप्न साकार होईल, असेही राज्यपालांनी यावेळी सांगितले.

    महात्मा गांधी यांच्या 149 व्या जंयतीनिमित्त राजभवन येथे एका विचारसत्राचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी ते बोलत होते.

    चर्चासत्रात सहभागी होताना ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी सांगितले की, महात्मा गांधी यांनी सत्य, अहिंसा व शांततेच्या मार्गाने सर्व जनतेला एकत्र जोडुन जनतेमध्ये राष्ट्र भावना निर्माण केली. महात्मा गांधीना केवळ राष्ट्रपिता म्हणुन चालणार नाही, तर गांधीजीची जीवनमुल्ये समजुन ती आचरणात आणणे गरजेचे आहे. गांधीजींनी श्रमाला प्रतिष्ठा मिळवून दिली. सुतकताई करण्यासाठी चरख्याचा वापर करून त्यांनी श्रमाचे महत्व अधोरेखित केले,असे त्यांनी संगितले. प्रत्येक व्यक्तीने दोन खादीची वस्त्रे वापरल्यास त्यातून लाखो लोकांना रोजगार मिळेल यास्तव खादीचे वस्त्र वापरण्याचे त्यांनी आवाहन केले.

    मणिभवनच्या अध्यक्षा उषाबेन ठक्कर यावेळी म्हणाल्या की महात्मा गांधी यांचे शांतता व अंहिंसेचे विचार आजही प्रासंगिक आहेत. महात्मा गांधी यांनी समाजाच्या सर्व स्तरातील लोकांच्या सक्षमीकरणासाठी कार्य केले, तसेच राजकारणाला नैतिकतेची जोड दिली.

    चर्चासत्राच्या सुरूवातीला राज्यपालांनी महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या वतीने महात्मा गांधींच्या विचारांनी प्रेरित सिनेमांमधील छायाचित्रे व पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. महात्मा गांधींच्या आवडत्या भजनांवर आधारित ‘भावांजली‘ हा कार्यक्रम यावेळी सादर करण्यात आला.

    चर्चासत्राला मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी, शासकीय अधिकारी तसेच निमंत्रित मान्यवर उपस्थित होते.