बंद

  समाजातील मान्यवरांनी खादीच्या प्रसारासाठी पुढाकार घ्यावा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

  प्रकाशित तारीख: October 11, 2019

  मुंबई, दि.11 : समाजातील सर्वच क्षेत्रातील श्रेष्ठांचे, नेतृत्वांचे व मान्यवरांचे अनुकरण सामान्य जनता करत असते. त्यामुळे या मान्यवरांनी खादीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी पुढाकार घ्यावा. महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती वर्षानिमित्त त्यांना ही खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

  जागतिक व्यापार केंद्र, आय एम खादी फाऊंडेशन यांच्यावतीने महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती वर्षानिमित्त हातमाग व खादी उत्पादनाच्या विव्हिंग पीस या फॅशन शोचे तसेच खादी वस्तू व कपड्यांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे व प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते जागतिक व्यापार केंद्रात झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्राचे उपाध्यक्ष विजय कलंत्री, रुपा नायर, दुपेंदर कौल, आयएम खादी फाऊंडेशनचे यश आर्य आदी उपस्थित होते. सुरुवातीस सुनीता भुयान यांनी व्हायोलिनवर ‘वैष्णव जन…’ या गीताची धून वाजविली.

  श्री. कोश्यारी म्हणाले की, वस्त्रौद्योगाचे महत्वाचे केंद्र अशी भारतीय जगभर ओळख आहे आणि ती आजही टिकून आहे. महात्मा गांधी यांनी खादीच्या वापराला चालना दिली. आता भारताबरोबरच विदेशातही मोठ्या प्रमाणावर खादीचा प्रसार होत आहे. खादीच्या लघु उत्पादकांची उन्नती साधून महात्मा गांधी यांचे स्वप्न साकार करावे, असे आवाहन श्री. कोश्यारी यांनी केले.

  यावेळी टोरंटोतील आंतरराष्ट्रीय डिझायनर तारा भुयान,न्यूयॉर्कच्या मेगन ओलारी, ढाका येथील मंताशा अहमद यांच्या खादी व हातमागाच्या डिझायनर कपड्यांचे विविध मॉडेलनी प्रदर्शन केले. श्री. कलंत्री यांनी स्वागत केले.