बंद

  संगीताचा वारसा पुढे नेण्यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक – उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू

  प्रकाशित तारीख: September 28, 2019

  संगीताचा वारसा पुढे नेण्यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक – उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू

  सुप्रसिद्ध गायिका डॉ. एम. एस. सुब्बलक्ष्मी यांच्या 102 व्या जयंतीनिमित्त नवोदित कलाकारांना शिष्यवृत्ती प्रदान

  मुंबई, दि. 28 : भारताला कर्नाटक आणि हिंदुस्थानी संगीताचा संपन्न वारसा आहे. आजच्या इंटरनेट,टेक्नॉलॉजीच्या काळात हा वारसा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी सामूहिक प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी सांगितले

  कर्नाटक संगीतातील सुप्रसिद्ध गायिका डॉ. एम. एस. सुब्बलक्ष्मी यांच्या 102 व्या जयंतीनिमित्त षण्मुखानंद चंद्रशेखरेंद्र सरस्वती सभागृहात आज गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर राज्यपाल चे. विद्यासागर राव, गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता, विजया बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आर. ई. शंकरनारायण कार्यक्रमास उपस्थित होते.

  उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यावेळी म्हणाले, भारताला विविध कलांचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. मात्र शहरीकरणाच्या वाढत्या वेगात या कला कुठेतरी मागे पडताना दिसतात. त्या कला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. मोबाईल, इंटरनेटमध्ये हरवलेल्या आपल्या मुलांना या कला, संस्कृतीची माहिती देऊन कलेचा समृद्ध वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. यासाठी फक्त केंद्र किंवा राज्य शासनाने नाही तर खासगी संस्थांनीसुद्धा सहभाग देणे गरजेचे आहे .

  भारतरत्न डॉ. एम. एस. सुब्बलक्ष्मी यांच्या नावाने ज्या तरुण, उदयोन्मुख वादकांना आज शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली आहे, त्यांनी डॉ. सुब्बलक्ष्मी यांचा वारसा पुढे नेण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन श्री. नायडू यांनी यावेळी केले.

  डॉ. सुब्बलक्ष्मी यांच्या नावाने आज प्रदान करण्यात आलेली शिष्यवृत्ती ही खासगी संस्थेची सगळ्यात मोठी शिष्यवृत्ती आहे, हे अतिशय कौतुकास्पद असल्याचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी सांगितले.

  आपल्या आई वडिलांचा सन्मान करा, आपल्या जन्मभूमीसाठी काही चांगले काम करा, मातृभाषेतून बोला, देशासाठी काम करा आणि आपल्या गुरुजनांचा आदर करा असा सल्लाही उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी उपस्थित नवोदित कलाकारांना दिला.

  या सोहळ्यासाठी देशभरातून एकूण 50 तरुण आणि होतकरु वादक आणि संगीतकारांना संगीत विषयातील ‍शिष्यवृत्ती देण्यात आली. पुढील तीन वर्षांसाठी प्रतिवर्षी 1 लाख रुपये याप्रमाणे या शिष्यवृत्तीचे स्वरुप असणार आहे. आतापर्यंत 18 शहरांतील कर्नाटक कंठसंगीत, व्हायोलिन, बासरी,नादस्वरम, मृदंग, सरोद, वीणा आणि हिंदुस्थानी कंठसंगीत अशा 13 प्रकारातील एकूण 103 तरुण कलाकारांना आजवर शिष्यवृत्त्ती देण्यात आली आहे.या शिष्यवृत्तीची सुरुवात 2013 मध्ये डॉ. एम.एस. सुब्बलक्ष्मी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ करण्यात आली आहे.