बंद

  विदेशी गुंतवणुकीसाठी राज्याची प्रतिष्ठा कायम राखण्यात पोलिसांचा मोठा वाटा – राज्यपाल

  प्रकाशित तारीख: January 19, 2019

  महान्यूज

  शुक्रवार, १८ जानेवारी, २०१९

  विदेशी गुंतवणुकीसाठी राज्याची प्रतिष्ठा कायम राखण्यात पोलिसांचा मोठा वाटा – राज्यपाल

  31 व्या महाराष्ट्रराज्य क्रीडा स्पर्धेचा समारोप

  नागपूर : राज्यातील पोलिस दलांवर अनेक आव्हाने, मर्यादा आणि अडथळे असूनही, महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात शांतता, कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित आहे. देशातील सर्वोत्तम पोलिसांमध्ये महाराष्ट्राच्या पोलीसांची गणना होते याचा अभिमान आहे. देशातील सर्वात शांत, प्रगतीशील आणि मेहनती राज्य म्हणून महाराष्ट्राची प्रतिष्ठा टिकवून ठेवण्यात राज्याच्या पोलिसांचा मोठा वाटा आहे. राज्याच्या या प्रतिष्ठेमुळेच विदेशी थेट गुंतवणूकीसाठी सर्वात आकर्षक राज्य म्हणून महाराष्ट्र राज्याकडे पाहिले जाते,असे प्रतिपादन राज्याचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी केले.

  एकतीसाव्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा 2019 चा समारोप कार्यक्रम शिवाजी स्टेडिअम येथे पार पडला, यावेळी श्री राव बोलत होते. याप्रसंगी ऊर्जामंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पोलीस महासंचालक दत्ता पडसलगिकर,अतिरिक्त पोलीस महासंचालक अनुपकुमार सिंग, अतिरिक्त पोलिस महासंचालक (आस्था) प्रज्ञा सरवदे, नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ भूषणकुमार उपाध्याय, आदी मान्यवर उपस्थित होते.

  राज्यपाल म्हणून महाराष्ट्रात आल्यापासून दरवर्षी पोलीस खेळ पुरस्कार कार्यक्रमामध्ये भाग घेतला असुन यामुळे थेट पोलिसांशी संवाद साधण्याची आणि राज्य पोलिसांच्या विविध समस्या समजून घेण्याची संधी मिळते असल्याचे राज्यपाल श्री राव म्हणाले.

  वार्षिक पोलीस खेळ नियमितपणे आयोजित करण्याची परंपरा कायम ठेवण्यासाठी त्यांनी पोलीस महासंचालकांचे कौतुक केले. पोलीस खेळांचे आयोजन व सुनियोजित व्यवस्था करण्यासाठी नागपूर पोलिसांचेही त्यानी अभिनंदन केले तर पोलिस क्रीडा स्पर्धेत सर्व सहभागी आणि विजेत्यांचे त्यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्यात.

  पुढे बोलतांना श्री. राव म्हणाले, आजच्या जगात तंत्रज्ञानाद्वारे चालविल्या जाणाऱ्या गुन्हेगारीचे स्वरूप आणि वाईट गोष्टींचे कार्यपद्धती वेगाने बदलत आहे. आजकाल, गुन्हेगारी केवळ वास्तविक जगात घडत नसून आभासी जगातही घडत आहे. गेल्यावर्षी हॅकर्स ने एटीएम कार्डच्या माध्यमातून अनेक कोटी रुपयांनी सरकारी बँकांना लुटले आहे. त्यातील गुन्हेगार मात्र अदृश्य राहिले.

  21 व्या शतकात महाराष्ट्राला 21 व्या शतकातील पोलीस दल आवश्यक आहे. यासाठी पोलिस शक्तीला स्मार्ट आणि टेक्नॉलॉजी फ्रेंडली फोर्समध्ये रूपांतरित करावे लागेल असेही श्री राव यांनी सांगितले.

  संपूर्ण जगभरातील पोलिस दलांसाठी सोशल मीडिया एक मोठे आव्हान आहे. खोटे प्रसार पसरवण्यासाठी, हिंसाचार उत्तेजित करण्यासाठी आणि विभाजनात्मक अजेंडाचा पाठपुरावा करण्यासाठी सोशल मीडियाचा दुरुपयोग केला जातो. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून गुन्हेगारीला रोखण्यासाठी मोठ्या प्रमणात जागरूकता निर्माण करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

  देशाच्या विकासात महिला समान भागीदार आहेत. महिलांनी वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी आणि आर्थिक प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी सुरक्षित आणि अधिक सक्षम वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करावा. महिला, मुले आणि वेगवेगळ्या लोकांवर होणाऱ्या गुन्हेगारीबद्दल शून्य-सहनशीलता असली पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले.

  पोलिस दलाच्या योग्यतेला सर्वोच्च प्राथमिकता दिली पाहिजे. सन 2020 हे वर्ष पोलिसांसाठी ‘फिटनेस वर्ष’ म्हणून घोषित करण्याचा विचार केला जाऊ शकतो. वर्षभर पोलीस कर्मचाऱ्यांमधील तंदुरुस्ती वाढविण्यासाठी विविध कार्यक्रम, उपाय आणि प्रोत्साहन योजना आखल्या जाऊ शकतात. पोलिसांनी राज्य पोलिसांमधील काही उत्कृष्ट खेळाडूंना समोर आणले याचा आनंद असून महाराष्ट्र पोलिस आशियाई खेळ आणि ऑलंपिकसारख्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी चॅम्पियन्सची निर्मिती करतील अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

  यावेळी महिला व पुरुष दोन्हीचे सर्वसाधारण सांघिक विजेतेपद मुंबई शहराला मिळाले. यावेळी विजेत्या संघाला राज्यपालांचे हस्ते पारितोषिक व ट्रॉफी देण्यात आली. बेस्ट ॲथलिटिक म्हणून सोनिया मोकल आणि वैभव हेडगे यांची निवड करण्यात आली असून त्यांना हिरो – होंडा तर्फे मोटर सायकल देण्यात आली. शंभर मिटर धावण्याच्या स्पर्धेत महिला गटात कोकण परिक्षेत्रातील मंजीरी खोडे यांना सुवर्ण, मुंबईच्या माधुरी टिपणे यांना रौप्य तर संजना लहानगे यांना कांस्य पदक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. पुरुष गटात ठाणे शहरचे वैभव हेडगे यांना सुवर्ण, कोल्हापूर परिक्षेत्रातील बिपीन ढवळे आणि अविनाश लाड यांना अनुक्रमे रजत आणि कास्य पदक देण्यात आले. सांघिक खेळांमध्ये हॉकीसाठी कोल्हापूर परिक्षेत्र, फुटबॉल अमरावती परिक्षेत्र, कबड्डी स्पर्धेत महिला नागपूर शहर तर कबड्डी पुरुष कोल्हापूर परिक्षेत्र, हॉलिबॉलसाठी महिला व पुरुष नागपूर शहर, बास्केटबॉल स्पर्धेत महिला नागपूर परिक्षेत्र, पुरुष कोल्हापूर परिक्षेत्र, खो-खो महिला व पुरुष मुंबई शहर यांनी पारितोषिक पटकाविले. भारोत्तोलन चॅम्पीयनशीप पुरुष मुंबई शहर. ज्युडोस्पर्धेत महिला – मुंबई शहर तर पुरुष एस.आर.पी.एफ. रेंज यांना मिळाले. पुणे व पिंपरी चिंचवड यांना कुश्ती स्पर्धेत पुरुष गटात चॅम्पीयनशीप मिळाली.

  यावेळी पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन केले. तर प्रास्ताविक अतिरिक्त पोलीस महासंचालक अनुपकुमार सिंग यांनी केले. आभार पोलीस आयुक्त डॉ भूषण उपाध्याय यांनी व्यक्त केले. राज्यभरातून सर्व जिल्ह्यातील खेळाडू उपस्थित होते.