राज भवन, पुणे
दापोडी हाउस, पुणे
पुण्यातील गणेशखिंड नाव उच्चारले की आज बहुतेकांच्या नजरेसमोर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येते. परंतु स्वातंत्र्यापूर्वी गणेशखिंड म्हटले की लोकांना मुंबई प्रांताच्या गव्हर्नरचे पुणे येथील पावसाळी निवासस्थान ‘गव्हरमेंट हाउस’ आठवत असे. गणेशखिंडीचा उल्लेख आला की दिनांक २२ जुन १८९७ रोजी रात्री घडलेल्या एका घटनेची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. पुण्यात प्लेगची साथ आली असताना प्लेग नियंत्रणाच्या नावाखाली पुण्याच्या नागरिकांवर अत्याचार केल्यामुळे पुण्याच्या जनतेच्या रोषाचे धनी ठरलेल्या वाल्टर चार्ल्स रँड यांचेवर त्या रात्री चाफेकर बंधूंनी हल्ला केला होता. रँड हे प्लेग नियंत्रण अधिकारी ‘गव्हरमेंट हाउस’ गणेशखिंड येथून इंग्लंडच्या राणीच्या राज्याभिषेकाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित समारंभाला उपस्थित राहून परतत होते. त्यापुढील इतिहास सर्वज्ञात आहे.
परंतु गणेशखिंड येथील गव्हर्मेंट गव्हर्नरचे अधिकृत निवासस्थान होण्यापूर्वी दापोडी येथे दुसरे निवासस्थान होते. त्यामुळे पुण्याच्या गव्हरमेंट हाउसची कथा वास्तविक तेथे सुरु होते. त्याठिकाणी ब्रिटीशांचे दक्खन मराठा प्रदेशाबद्दल राजकीय कुटनीती – रणनीती ठरली. आज त्या निवासाच्या मूर्त आणि अमूर्त खाणाखुणा कालौघात पूर्णपणे मिटल्या आहेत.
पुणे या ठिकाणी मुंबई राज्याच्या गव्हर्नरचे तसेच स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राच्या राज्यपालांचे पावसाळी निवासस्थान जवळजवळ १८० वर्षांपासून राहिले आहे. अलिकडच्या काळात राज्यपालांचा पुणे येथील मुक्काम कमी होत आहे. तरी देखील दरवर्षी १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी शासकीय समारोह राज्यपालांच्या उपस्थितीत पुणे येथे होत असतो. २६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनी मात्र राज्यपालांचे ध्वजवंदन मुंबई येथे होत असते. पुणे येथे जून ते सप्टेंबर असे चार महिने आणि मे महिन्यात महाबळेश्वर येथे मुक्काम ठेवणारे श्रीप्रकाश (१९५६ – १९६२) हे बहुदा शेवटचे राज्यपाल होते.
एव्हाना पुणे ही पश्चिम भारताची दुसरी राजधानी झाली होती. लष्कर तसेच अनेक सरकारी विभागांचे मुख्यालय झाले होते. याबद्दल म्याक्लिन यांनी १८७५ साली असा अभिप्राय लिहिला आहे : “ पुणे येथे भारतातील गव्हर्नर लोकांच्या शाही निवासांपैकी सर्वोत्तम असे निवासस्थान आहे. तसेच पश्चिम भारताची संसद बसू शकेल इतके प्रशस्त परिषद सभागृह आहे. मात्र प्रत्यक्षात त्या ठिकाणी वर्षातून जेमतेम तीन चार वेळा डझनभर विधायक बसतात.”
गणेशखिंड येथे नव्याने बांधून पूर्ण झालेले व सन १८७१ साली निवासायोग्य झालेले गव्हर्मेंट हाउस पाहून मॅक्लिन प्रभावित झाले.
महाबळेश्वर येथील निवासस्थान ब्रिटिशांनी केवळ मुंबई येथील उष्ण व दमट हवामानापासून आराम मिळावा या हेतूने बांधले होते, मात्र पुणे येथे गव्हर्मेंट हाउस बांधण्यामागे राजकीय उपयुक्तता हा एल्फिनस्टन यांचा मुख्य हेतू होता. पुण्याच्या निवासस्थानाचा त्यांच्या दृष्टीने आणखी एक फायदा असा होता की पावसाळ्यात पुण्याचे हवामान इंग्लंडच्या उन्हाळ्याप्रमाणे आल्हाददायक होते.
अनेकदा प्रवासाची दगदग आणि बेभरवश्याचे हवामान असले तरी देखील, एल्फिनस्टन मुंबई आणि परळ पासून दूर राहणे पसंत करीत असे दिसते. त्यांनी मलबार पोइंट येथे एक दुमदार कुटी बांधली तर खंडाळा येथे बंगला बांधला. अनेकदा ते नयनरम्य देखावा व थंडगार हवामान असलेल्या घोडबंदर येथे एका लहानग्या परंतु सुंदर हवेलीमध्ये मित्रांसमवेत राहत असत.
गव्हर्नर हाऊस, पुणे येथे आज राज्यपाल यांच्या पुण्यातील मुक्कामादरम्यान राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान “पुण्यभूषण” आहे. “पुण्य लक्षण”, “पुण्य चिंतन” व अशी इतर व्हीव्हीआयपी गेस्ट हाऊस आहेत, जी भारताचे माननीय राष्ट्रपती, भारताचे माननीय उपराष्ट्रपती, भारताचे माननीय पंतप्रधान, भारताचे माननीय गृहमंत्री आणि भारताचे माननीय सरन्यायाधीश यांसारख्या उच्चस्तरीय मान्यवरांच्या निवासासाठी वापरली जात आहेत.
गव्हर्नर हाऊस, पुणे यांच्या मालकीची सुमारे 412 एकर जमीन सार्वजनिक हितासाठी 999 वर्षांच्या भाडेकरारावर पुणे विद्यापीठाला भाडेतत्त्वावर देण्यात आली आहे. तसेच गव्हर्नर हाऊसची सुमारे 10 एकर जमीन यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन अकादमी, पुणे यांना हस्तांतरित करण्यात आली आहे.
***