बंद

  श्री भगत सिंह कोश्यारी

  Shri Bhagat Singh Koshyari

  श्री भगत सिंह कोश्यारी


  माजी राज्यपाल
  श्री भगत सिंह कोश्यारी ( 05.09.2019 -17.02.2023)
  महाराष्ट्राचे राज्यपाल श्री भगत सिंह कोश्यारी हे उत्तराखंड राज्याच्या राजकारणातील एक धुंरधर लोकनेते राहिले आहेत. दिनांक १७ जून १९४२ रोजी जन्मलेले भगत सिंह कोश्यारी अल्मोडा महाविद्यालय येथे शिकत असताना विद्यार्थी संघटनेचे महासचिव म्हणून निवडून आले. त्यानंतर त्‍यांनी उत्तरप्रदेश मधील एटा येथे काही काळ अध्यापनाचे कार्य केले. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे निष्ठावान स्वंयसेवक असलेल्या कोश्यारी यांना आणिबाणीला विरोध केल्यामुळे सन १९७५ ते १९७७ या कालावधीत तुरुंगवास भोगावा लागला.
  सन १९९७ साली ते उत्तर प्रदेश विधान परिषदेवर निवडून गेले. उत्तराखंड राज्याच्या निर्मिती नंतर तेथील पहिल्या मंत्रिमंडळामध्ये ते उर्जा, पाटबंधारे,न्याय व विधी मंडळ कामकाज मंत्री झाले. सन २००१ साली ते उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री झाले. सन २००२ ते २००७ या कालावधीमध्ये ते उत्तराखंड राज्य विधानसभेमध्ये विरोधीपक्ष नेते होते. सन २००८ साली कोश्यारी उत्तराखंड राज्यातून राज्यसभेवर निवडून गेले. ते भारतीय जनता पक्षाचे आखिल भारतीय उपाध्यक्ष तसेच उत्तराखंड राज्य भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देखिल राहिले आहेत. सन २०१४ साली ते नैनिताल-उधमसिंगनगर लोकसभा मतदार संघातून लोकसभेवर निवडून गेले.
  समाजसेवेचा पिंड असलेल्या कोश्यारी यांनी उत्तराखंड राज्यात अनेक शाळा व महाविद्यालयांची स्थापना केली. कोश्यारी यांचा जनसंपर्क दांडगा असून उत्तराखंड राज्यातील टिहरी धरण प्रकल्पग्रस्त लोकांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले.
  दिनांक ५ सप्टेंबर २०१९ रोजी श्री कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली. दिनांक १९ ऑगष्ट २०२० रोजी त्यांनी गोव्याच्या राज्यपाल पदाची (अतिरिक्त पदाची) शपथ घेतली.
दिनांक १९ ऑगस्ट २०२० ते १४ जुलै २०२१ या कालावधीत राज्यपाल कोश्यारी यांनी गोव्याच्या राज्यपालपदाची अतिरिक्त जबाबदारी पार पाडली.

  महाराष्ट्रातील आपल्या राज्यातील साडेतीन वर्षांच्या कार्यकाळांत श्री कोश्यारी यांनी राज्यातील सर्व जिल्हांना भेटी दिल्या. सार्वजनिक विद्यापीठांचे कुलगुरु या नात्याने त्यांनी सर्व विद्यापीठांच्या दीक्षांत समारंभांना उपस्थित राहून विद्यार्थ्यांना संबोधित केले. विद्यापीठ दीक्षांत समारोह तसेच राज्यातील सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये इंग्रजी ऐवजी मराठी किंवा हिंदी भाषेच्या वापराबाबत ते आग्रही राहिले. त्यांच्या कार्यकाळापैकी दिड वर्षे जागतिक करोना (कोविड -19) संसर्गाचा उद्रेक झाला. दि. १२ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर २०२० या काळात राज्यात राष्ट्रपती राजवट लागली होती. श्री कोश्यारी यांच्या काळात राजभवन येथील ब्रिटीश कालीन भूयारामध्ये ‘क्रांति गाथा’ हे स्वातंत्र्य समरातील क्रांतीकारकांचे दालन तयार करण्यात आले तसेच नवा दरबार हॉल सभागृह व ‘जलभूषण’ ही राज्यपालांचे निवासस्थान असलेली निवासीस्थान असलेली इमारत बांधुन पूर्ण झाली. दि. १७ फेब्रुवारी २०२३ रोजी श्री भगतस‍िंह कोश्यारी यांनी कार्यकाळ पूर्ण होण्याअगोदर स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली.

  उत्तराखंड मधील पिथोरागड येथुन प्रकाशित केल्या जाणाऱ्या ‘पर्वत पियुष’ या साप्ताहिकाचे ते संस्थापक संपादक राहिले आहेत. त्यांची दोन पुस्तके ‘उत्तरांचल प्रदेश क्यो?’ आणि ‘ उत्तरांचल: संघर्ष एवं समाधान’ प्रकाशित झाली आहेत.
  श्री भगत सिंह कोश्यारी यांचा पत्ता :-
  श्री भगत सिंह कोश्यारी,
  माजी राज्यपाल, महाराष्ट्र
  बी – १८७ सेक्टर ४
  डिफेन्स कॉलनी, डेहराडून
  उत्तराखंड
  पिन २४८००१