बंद

    श्री. चेन्नमनेनी विद्यासागर राव (30.08.2014 – 04.09.2019)

    श्री. चेन्नमनेनी विद्यासागर राव

    श्री. चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी दिनांक ३० ऑगस्ट २०१४ रोजी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ घेतली.

    सार्वजनिक जीवनातील जनसेवेचा व्यापक आणि बहुविध अनुभव असलेले विद्यासागर राव तेलंगणा राज्यातील एक वरिष्ठ भाजप नेते होते. स्व. श्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रीमंडळात ते सुरूवातीला केंन्द्रीय गृहराज्यमंत्री व त्यानंतर वाणिज्य व उद्योग खात्याचे राज्यमंत्री होते.

    सन १९९८ साली विद्यासागर राव करीमनगर मतदार संघातून बाराव्या लोकसभेवर पहिल्यांदा निवडून गेले. १९९९ साली त्यांची आंध्रप्रदेश भाजपचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. सन १९९९ साली ते तेराव्या लोकसभेवर दुसऱ्‍यांदा निवडून गेले.

    लोकसभेवर निवडून जाण्यापूर्वी विद्यासागर राव करीमनगर जिल्हयातील मेटपल्ली विधानसभा मतदार संघातून आंध्रप्रदेश विधान सभेवर सन १९८५,१९८९ व १९९४ असे सलग तीनवेळा निवडून गेले. या तिन्ही वेळा ते भाजप सांसदिय मंडळाचे सभागृहातील गटनेते होते.

    १२ फेब्रुवारी १९४२ साली जन्मलेले विद्यासागर राव लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. विज्ञान स्नातक (B.Sc.) झाल्यानंतर त्यांनी उस्मानिया विदयापीठाच्या विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी प्राप्त केली.

    विदयार्थी दशेपासूनच अखिल भारतीय विदयार्थी परिषदेचे सक्रिय सदस्य असलेले विद्यासागर राव उस्मानिया विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले होते.

    विद्यासागर राव यांनी १९७३ साली करीमनगर जिल्हयात वकिलीची सुरूवात केली. करीमनगर येथे त्यांनी सुरूवातीला जनसंघ व नंतर जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष म्हणून देखिल काम केले आहे.

    विद्यासागर राव यांचा कार्यकाळ दिनांक ४ सप्टेंबर २०१९ रोजी संपुष्टात आला.