बंद

  श्री. एस्. सी. जमीर (19.07.2008 – 21.01.2010)

  श्री. एस्. सी. जमीर गोव्याचे राज्यपाल श्री. एस्. सी. जमीर यांनी दि. १९ जुलै २००८ रोजी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली. श्री. एस् एम्. कृष्णा यांच्या राजीनाम्यानंतर गोवा येथे राज्यपाल असलेल्या जमीर यांचेकडे काही काळ महाराष्ट्राचा अतिरिक्त कार्यभार होता.

  श्री. एस्. सी. जमीर हे, १९ व्या शतकाच्या शेवटी – शेवटी ज्यांना अमेरिकन ख्रिस्ती मिशनरी रेव्हरंड डब्ल्यू.ई.क्लर्क यांना भेटण्याची संधी मिळाली होती आणि नागालँडमध्ये ख्रिश्चन धर्म आणण्यास जे कारणीभूत ठरले होते अशा जॉगशिंनोकडेंग यांचे नातू असून नागालँडच्या मोकोकचुंग जिल्ह्यातील उडमा गावचे सेनयांगबा जमीर यांचे सुपुत्र आहेत व एओ नागा जमातीचे आहेत.

  दि. १९ ऑक्टोबर, १९३१ रोजी जन्मलेल्या जमीर यांनी आपले प्राथमिक शिक्षण मोकोकचुंग, कलकत्ता (पश्चिम बंगाल) येथे घेतले व उच्च शिक्षण, अलाहाबाद विद्यापीठ येथून पूर्ण केले असून, तेथेच त्यांनी बी.ए.केले व १९५८ मध्ये एलएलबी ही पदवी संपादन केली. ते १९५४ पासून १९५७ पर्यंत अलाहाबाद येथील विद्यार्थी ख्रिश्चन चळवळीचे अध्यक्ष होते व महाविद्यालयीन विद्यार्थीदशेपासून विद्यार्थी व ख्रिश्चन धर्माच्या कार्यांमध्ये सक्रियपणे सहभागी झाले होते. धर्मनिरपेक्ष व्यक्ती म्हणून ख्याती असलेल्या श्री.जमीर यांचेवर चारवेळा जीवघेणा हल्ला झाला होता, मात्र त्यातून ते बचावले.

  सन १९५० मध्ये, एकसंघ असलेल्या असामामधील तत्कालीन नागा हिल्स हा जिल्हा जेव्हा हिंसाचाराच्या व कठीण परिस्थितीतून मार्गक्रमण करीत होता तेव्हा या भूमीवर शांतता प्रस्थापित करण्याचा व परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचा मार्ग शोधण्यासाठी कोहिमा येथे, १९५७ मध्ये नागा जनपरिषदेच्या अधिपत्याखाली अनेक नागा लोक एकत्रित जमले होते. १९५८ मध्ये उनग्मा गावात घेतलेल्या नागा जनपरिषदेच्या दुसऱ्या बैठकीत, आयोजकांनी 27वर्षीय जमीर यांना स्वागत समितीचे अध्यक्ष केले होते आणि त्या बैठकीमध्ये, नागा जनपरिषदेचे सहसचिव म्हणून त्यांची सर्वानुमते निवड केली होती. सन १९५९ मध्ये, नागा जन परिषदेच्या तिसऱ्या व शेवटच्या बैठकीत एक निवेदन तयार करून ते भारत सरकारला सादर केले होते आणि त्यात काही अल्पसे बदल केल्यानंतर त्या निवेदनास भारत सरकार व नागा जन परिषद यांनी परस्पर संमती दिली होती. यामधूनच सन १९६३ मध्ये, भारतीय संघराज्यातील १६ वे राज्य म्हणून नागालँडची निर्मिती झाली. या करारावर स्वाक्षरी करणाऱ्या व्यक्तींपैकी जमीर हे एक असून, ते आधुनिक नागालँडच्या शिल्पकारांपैकी एक शिल्पकार समजले जातात.

  श्री. जमीर हे नागालँड राज्यातील पहिले लोकसभा सदस्य होते. त्यांनी १९६१ ते १९७० पर्यंत संसद सदस्य म्हणून काम केले असून १९६८ ते १९७० या कालावधीत त्यांनी, केंद्रीय रेल्वे, कामगार व पुनर्वसन उपमंत्री, केंद्रीय जनजाति विकास आणि सहकार, अन्न व कृषि उपमंत्री म्हणून पदे भूषविली होती. तत्कालीन पंतप्रधान व परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचा प्रभार असलेले श्री. पंडित जवाहरलाल नेहरू यांचे संसदीय सचिव म्हणूनदेेखिल त्यांनी काम केले होते.

  श्री. जमीर हे, १९७१ मध्ये नागालँड विधानसभेवर पहिल्यांदा निवडून गेले आणि तेव्हापासून ते २००४ पर्यंत विधानसभेची एकही निवडणूक हरले नाहीत. त्यांनी अनेक पदे भूषवून नागालँडच्या जनतेची सेवा केली. ते १९८०, १९८२ ते १९८६ आणि १९९३ ते २००३ या कालावधीत नागालँडचे मुख्यमंत्री होते. त्यांचा नागालँडचे मुख्यमंत्री म्हणून असलेला पदावधी सर्वात जास्त आहे. १९९३ पासून २००४ पर्यंत म्हणजे सलग ११ वर्षे ते नागालँड प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते. १७ जुलै २००४ रोजी त्यांची गोव्याच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली.

  “मी नागालॅन्ड या अतिपूर्वेकडील भागातून आलो असून मला अतिपश्चिमेकडील राज्याच्या लोकांची सेवा करण्याच्या संधी मिळत आहे, हे मी माझे भाग्य समजतो” , असे श्री. जमीर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले होते.

  श्री. जमीर यांचा विवाह श्रीमती इन्काम्ग्लेम्ला (अलेम्ला) यांच्याशी १९५८ मध्ये झाला असून त्यांना तीन मुलगे व दोन मुली आहेत. त्यांच्या धाकट्या कन्येचे १९९६ मध्ये निधन झाले.

  फेब्रुवारी २००९ साली जमीर यांच्या सार्वजनिक जीवनातील सेवेला ५० वर्षे पूर्ण झाली.

  श्री जमीर यांना वाचनासोबत बॅडमिंटन खेळण्याची व पोहण्याची आवड होती. दि. २१ जानेवारी २०१० रोजी ते महाराष्ट्राच्या राज्यपालपदी होते. दि. २१ मार्च २०१३ रोजी त्यांची ओरिसा राज्याच्या राज्यपालपदी नेमणूक करण्यात आली.