बंद

  भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 66 व्या वर्धापनदिनानिमित्त महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या भाषणाचा स्वैर मराठी अनुवाद

  प्रकाशित तारीख: January 26, 2016

  भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 66 व्या वर्धापनदिनानिमित्त

  महाराष्ट्राचे मा.राज्यपाल श्री.सी.विद्यासागर राव यांच्या

  भाषणाचा स्वैर मराठी अनुवाद

  दिनांक : 26 जानेवारी, 2016, स्थळ : शिवाजी पार्क, मुंबई

  बंधु आणि भगिनींनो,

  1. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 66 व्या वर्धापनदिनानिमित्त मी महाराष्ट्राच्या जनतेला शुभेच्छा देतो. भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत असलेले आदर्श आणि लोकशाही मूल्ये बळकट करण्याचा आपण आज सर्वजण निर्धार करुया.

  2. आपला देश भारतरत्न स्वर्गीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 125 वी जयंती साजरी करीत आहे. या प्रयोजनासाठी महाराष्ट्र शासनाने 125 कोटी रुपये इतक्या निधीची तरतूद केली आहे. मला हे सांगताना आनंद होतो की, भारत सरकारने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन व कार्य यावर आधारित पंचतीर्थ म्हणून पाच राष्ट्रीय स्मारके विकसित करण्याचे ठरविले आहे. मला सांगायला आनंद वाटतो की, या पाच पंचतीर्थांपैकी दोन राष्ट्रीय स्मारके महाराष्ट्रात उभारली जाणार आहेत.

  3. किमान प्रशासन आणि जास्तीत जास्त सुशासन या ब्रीदवाक्याचे पालन करत असताना सेवा हक्क कायद्याखालील एकूण 252 अधिसूचित सेवांपैकी 47 सेवा या ऑनलाईन सुरु करण्यात आल्या आहेत.

  4. आपले सरकार या पोर्टलच्या पहिल्या टप्प्याला चांगले यश मिळाले असून माझ्या शासनाने लोकांना, त्यांचे विचार व सूचना शासनाकडे पोहचवता याव्यात तसेच त्यांना तक्रारी मांडणे शक्य व्हावे यासाठी या प्रकल्पाचा दुसरा टप्पाही कार्यान्वित केला आहे.

  5. मला हे सांगताना आनंद वाटतो की, मुंबई नागपूर सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेस वे, मुंबई किनारी मार्ग, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, नागपूर, पुणे व मुंबई येथील मेट्रो प्रकल्प, नवी मुंबई येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ यांसारखे अनेक महत्वाचे पायाभूत सुविधा प्रकल्प माझ्या शासनाने हाती घेतले असून त्यांच्या कार्यांस गती दिलेली आहे.

  6. मित्रहो, मला हे सांगताना आनंद होत आहे की, जगाला उत्पादन क्षेत्रातील भारताची क्षमता दाखवून देण्याकरिता मुंबई येथे पुढील महिन्यात होणाऱ्या मेक इन इंडिया सप्ताहाचे महाराष्ट्र यजमानपद भूषवीत आहे.

  7. मित्रहो, माझ्या शासनाने नागरिकांची सुरक्षितता आणखी मजबूत करण्यासाठी, राज्याचा बराच भाग डिजिटल टेहळणीखाली आणण्याचे ठरविले आहे. मला सांगायला आनंद होतो की, पुणे शहरात सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आली असून ते डिजिटल टेहळणीखालचे पहिले शहर ठरले आहे. दक्षिण मुंबईतही या प्रकल्पाची अंमलबजावणी केली आहे.

  8. माझ्या शासनाने अखिल भारतीय सेवांकरिता केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये राज्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांकरिता गुणवत्ताधारित विशेष शिष्यवृत्ती योजना सुरु करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे राज्यातील उमेदवारांचे या परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे प्रमाण वाढण्यास मदत होणार आहे.

  9. शासनाच्या जबाबदारीचा एक भाग म्हणून युवकांमधील कौशल्य विकासास चालना देण्यासाठी राज्यातील एक लाख युवकांना या योजनेअंतर्गत व्यवसाय प्रशिक्षण देण्यासाठी एक विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. मला सांगण्यास आनंद होत आहे की, राज्य शासनाचे पहिले आयआयएम नागपूर येथे सुरु करण्यात आले आहे.

  10. या वर्षीदेखील राज्याच्या विभिन्न भागातील शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. चालू खरीप हंगामात या दुष्काळामुळे महाराष्ट्रातील 15,747 गावे बाधित झाली आहेत. शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून शासनाने हिवाळी अधिवेशनामध्ये 10,512 कोटी रुपयांचे विशेष पॅकेज घोषित केले आहे. यापैकी 2 हजार कोटी रुपयाची आर्थिक मदत अशा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिली आहे. शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत 14 दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अन्नधान्य पुरविलेले आहे. या योजनेअंतर्गत, सर्व 68 लाख केशरी रंगाचे रेशनकार्ड धारण करणाऱ्या व्यक्तींना गहू 2 रुपये किलो दराने आणि तांदूळ 3 रुपये किलो दराने दिला जात आहे.

  11. माझ्या शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सामाजिक आणि आर्थिक सुरक्षा पुरविण्यासाठी स्वर्गीय गोपनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरु केली आहे.

  12. लहानात लहान असलेल्या शेतकऱ्यालाही नैसर्गिक आपत्तीत पिकाचे नुकसान झाल्यास पूर्ण नुकसानभरपाई मिळणे शक्य व्हावे यासाठी राज्यात येत्या खरीप हंगामापासून प्रधानमंत्री फसल बिमा योजना राबविण्यात येईल. या योजनेचा फायदा ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेले नाही त्यांनादेखील मिळणार आहे.

  13. माझ्या शासनाने अटल सौर कृषी पंप योजनेअंतर्गत राज्यात 10 हजार सौर कृषी पंप बसविण्याचे ठरविले आहे.

  14. शासन, ग्राम स्वच्छता अभियान, पिण्याचे शुद्ध आणि सुरक्षित पाणी, उत्तम दळणवळणासाठी रस्त्यांची बांधणी आणि स्मार्ट ग्रामपंचायतींसह ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी विविध उपाययोजना करीत आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत गावे रस्त्यांनी जोडली जात आहेत.

  15. भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न स्वर्गीय डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना एक श्रद्धांजली म्हणून, माझ्या शासनाने आदिवासी भागातील गरोदर आणि स्तनदा मातांना मोफत सकस आहार पुरविण्यासाठी एपीजे अब्दुल कलाम अमृत योजना सुरु केली आहे.

  16. स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचा विस्तार म्हणून महाराष्ट्र हागणदारीमुक्त करण्याच्या उद्देशाने आणि नगरपालिका घनकचऱ्याचे 100टक्के विलग्नीकरण, संकलन आणि त्याचे संस्करण याची सुनिश्चिती करण्यासाठी शासन काम करीत आहे. अनेक नगरपरिषदा आपले शहर स्वच्छ व हरित करण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पना राबवीत आहेत. मला हे सांगण्यास आनंद वाटतो की, महाराष्ट्रातील 50 शहरे या वर्षाअखेरीस संपूर्ण स्वच्छ बनतील.

  17. नवीकरण व नागरी परिवर्तनासाठीच्या अटल (अमृत) अभियानांतर्गत, महाराष्ट्रातील 43 शहरे निवडण्यात आली आहेत. या शहरांना पाणीपुरवठा, स्वच्छता, खुल्या जागा व प्रदूषण-मुक्त पर्यावरण यांसारख्या सुविधा पुरविणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने 2,077.96 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तसेच स्मार्ट शहर अभियानांतर्गत, महाराष्ट्रातील 10 शहरांची निवड करण्यात आली आहे.

  18. महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी, महाराष्ट्रातील 314 महिलांना ऑटोरिक्षा चालविण्याचे परवाने देण्यात आले आहेत.

  19. नाशिक-त्र्यंबकेश्वर येथील सिंहस्थ कुंभमेळा अत्यंत शांततेने पार पडला ही अत्यंत समाधानाची बाब आहे. मी, या कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य शासन, इतर सर्व संघटना व व्यक्ती यांचे अभिनंदन करतो.

  20. शेवटी, मी पुनश्च एकदा प्रजासत्ताक दिनाच्या या आनंदमयी प्रसंगी महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा देतो. जीवनात अधिकाधिक यशाची शिखरे गाठण्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूया!

  जय हिंद ! जय महाराष्ट्र !