‘भारतीय पर्यटकांचा ओढा इंडोनेशियाकडे वाढला‘ : नवनियुक्त वाणिज्यदूतांची राज्यपालांना माहिती
इंडोनेशिया जगातील सर्वात मोठा मुस्लिम देश असला तरीही तेथे भारतीय संस्कृतीचा आणि विशेषतः संस्कृत भाषेचा मोठा पगडा आहे. आमच्या लोकांची नावे विष्णु, ईन्द्र आहेत, मात्र धर्म मुस्लिम आहे. इंडोनेशिया भारताशी ‘गरुड‘ विमानसेवेमुळे थेट जोडले गेले असल्यामुळे भारतातून इंडोनेशियाला येणार्या पर्यटकांची संख्या सातत्याने वाढत आहे. गेल्यावर्षी ६ लाखांहून अधिक भारतीय पर्यटकांनी इंडोनेशियाला भेट दिली, अशी माहिती इंडोनेशियाचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत एडे सुकेंदर यांनी आज येथे दिली.
मुंबईतील वाणिज्यदूतपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रथमच एडे सुकेंदर यांनी बुधवारी (दि. १३) राज्यपाल चे. विद्यासागर राव यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
इंडोनेशियातील बांडुंग, योग्यकर्ता व बाली या ठिकाणी लोकांनी रामायण संस्कृती जपून ठेवली असून अलिकडेच मुंबईत झालेल्या आंतरराष्ट्रीय रामायण महोत्सवामध्ये इंडोनेशियातील कलाकारांनी रामायण सादर केल्याचे त्यांनी संगितले.
भारतीय चित्रपट तसेच दूरचित्रवाणी मालिका इंडोनेशियात लोकप्रिय आहेत. लोकांना मुंबई तसेच बॉलीवुडबद्दल विशेष आकर्षण आहे. मात्र इंडोनेशियातून भारतात येणार्या पर्यटकांची संख्या केवळ ३६००० इतकी असल्याचे त्यांनी संगितले.
आयआयटी मुंबईची शाखा इंडोनेशियात
आयआयटी मुंबईची एक शाखा इंडोनेशियात सुरू करण्याबद्दल उच्च स्तरावर चर्चा झाली असून आपण अशी शाखा सुरू करण्याबाबत प्रयत्नशील असल्याचे एडे सिकेंदर यांनी संगितले.
इंडोनेशियाने सांस्कृतिक संबंध, चित्रपट निर्मिती, पर्यटन विकास याशिवाय औषधीनिर्माण, ऑर्गनिक फार्मिंग या क्षेत्रांमद्धे महाराष्ट्राशी सहकार्य प्रस्थापित करावे, अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.