बंद

    भगवान ऋषभदेवांचा अहिंसेचा संदेश आजही अनुकरणीय – राष्ट्रपती राम नाथ कोविंद

    प्रकाशित तारीख: October 22, 2018

    महान्यूज

    दि. 22 ऑक्टोबर, 2018

    वृ.वि.3427

    30 आश्व‍िन 1940 (रात्रौ 7.00 वा.)

    भगवान ऋषभदेवांचा अहिंसेचा संदेश आजही अनुकरणीय

    – राष्ट्रपती राम नाथ कोविंद

    नाशिक, दि. 22 : अहिंसेच्या माध्यमातून शांती आणि शांततेच्या माध्यमातून अहिंसेचा संदेश भगवान ऋषभदेव यांनी दिला आहे. जगातील सद्यस्थिती पाहता त्यांचा अहिंसेचा संदेश आजही प्रासंगिक आणि अनुकरणीय आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी केले.

    सटाणा तालुक्यातील भिलवाड (मांगीतुंगी) येथे आयोजित विश्वशांती अहिंसा संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्यपाल चे. विद्यासागर राव,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, श्रीमती सविता कोविंद, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, पालकमंत्री गिरीष महाजन, आमदार राजेंद्र पाटणी, गणिनी प्रमुख आर्यिकाज्ञानमती माताजी, आर्यिकारत्न चंदनामती माताजी, मूर्ती निर्माण समितीचे अध्यक्ष रविंद्रकिर्ती स्वामी आदी उपस्थित होते.

    राष्ट्रपती म्हणाले, मानवी कल्याणासाठी कार्य करणाऱ्या जैन धर्माचे अधिष्ठान‘अहिंसा परमो धर्मा:’ हा संदेश आहे. तीर्थंकरांनी सम्यक ज्ञान, सम्यक दर्शन आणि सम्यक आचरणाचा संदेश दिलेला आहे. अहिंसा केवळ मानवाप्रती अभिप्रत नसून मन, वचन आणि आचरणाने अहिंसा तत्वाचे पालन करणे गरजेचे आहे. केवळ मानवाप्रती संवेदनशील आणि सहिष्णू न राहता पशुपक्ष्यांप्रती, प्रकृतीच्याप्रती सहिष्णुता बाळगण्याचा ऋषभदेवांनी दिलेला अहिंसेचा संदेश आजही तेवढाच उपयुक्त आहे, असे ते म्हणाले.

    भगवान ऋषभदेव यांची या परिसरात साकारण्यात आलेली भव्य अशी मूर्ती आपल्यासाठी निश्चितच अहिंसा धर्माचे महत्त्व प्रतिपादीत करणारी आहे. त्यामुळे आपणही अहिंसेच्या तत्वाचं पालन करीत आपले आचरण उंचवावे, असे सांगून राष्ट्रपती कोविंद म्हणाले, नदी, सरोवर अस्वच्छ करणे म्हणजे हिंसेचे प्रतीक मानले जाते.त्यामुळे प्रत्येकाने स्वच्छता पाळली पाहिजे.

    भगवान महावीरांनी अपरिग्रह तत्वाला महत्त्व दिले आहे. आज निसर्गाचे मोठ्या प्रमाणात शोषण होत आहे. हे तत्व आचरताना प्रकृती प्रती सम्यक व्यवहार करावा लागेल.निसर्गनिर्मित साधनस्रोतांचासंतुलितपणे वापर केला पाहिजे. या साधनांचा अतिवापर केल्यास प्रकृतीचा आणि परिणामत: मानवी जीवनाचाऱ्हास होईल. अहिंसा आणि करुणेचा संदेश यासाठी उपयुक्त ठरेल. केंद्र सरकारनेदेखील या तत्वाला अनुसरून सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

    महाराष्ट्र संतांची आणि महापुरुषांची भूमी असून राज्याने सामाजिक समरसतेचा संदेश देशाला दिला आहे. राज्य शासनाने जनकल्याणाच्या भूमीकेतून गेल्या चार वर्षात चांगली कामगिरी केल्याचे राष्ट्रपती म्हणाले. नाशिक ही पावन भूमी असून धार्मिक पर्यटनासाठी महत्वाची असल्याचेही त्यांनी नमूद केले.

    यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,भगवान ऋषभदेव हे आदर्श शासक होते. करुणा आणि अहिंसेचा मंत्र त्यांनी दिला. जगाला कल्याणकारी मुल्यांना समर्पित करण्याचे कार्य त्यांच्या माध्यमातून झाले. मानवी कल्याण, शांतता, बंधूभाव आदींची मूल्ये समाजात रुजविण्याचे कार्य त्यांनी केले. त्यांच्या 108 फुटाच्या अतिभव्य मूर्तीच्या दर्शनाने मूल्यविचारांची प्रेरणा मिळते, असे त्यांनी सांगितले.

    तीर्थंकरांनी केवळ मानवाप्रती हिंसेचा विचार मांडला नाही तर यात प्रकृतीचादेखील समावेश होता. आज पर्यावरण बदलाचे आव्हान समोर असताना त्यांची ही शिकवण पुढे नेण्याची गरज आहे. ‘तेन तक्तेन भुंजित:’ हा विचार आपण विसरत आहोत. प्रकृतीचा ऱ्हास थांबविला नाही तर मानवजातीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल. निसर्गाशी सहचर्य राखत जगण्याचा तीर्थंकरांचा संदेश विश्वशांती संमेलनाच्या निमित्ताने जगभर पोहोचावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

    मांगीतुंगी परिसर विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही देताना ते म्हणाले, या परिसराच्या विकासासाठी राज्य शासनाने नियोजन केले असून विविध कामांना मंजूरी देण्यात आली आहे. आतापर्यंत 55 कोटींची विकासकामे करण्यात आली आहेत.उर्वरित कामे लवकरच मार्गी लागतील.

    दुष्काळसदृष परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी विविध उपाययोजना कऱण्यात येत आहेत. यासंदर्भात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही राज्यातील परिस्थितीचा मुकाबला कऱण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केंद्र शासन करेल, असे सांगितले आहे. यासंदर्भातील 179 तालुक्यातील टंचाईसदृश्य जाहीर करण्याबाबत शासन आदेश लवकरच काढण्यात येईल. त्यानुसार 9 प्रकारच्या सवलती दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना देण्यात येतील, असे ते म्हणाले.

    केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे म्हणाले की, प्रेम, दया, करुणा, सहकार्य, बंधुभावाची शिकवण भगवान ऋषभदेवांच्या विचारातून मिळते. भगवान ऋषभदेवांची मूर्ती या परिसरातील महत्वपूर्ण वारसा ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.

    विश्वशांतीसाठी जैनधर्मियांचा अहिंसेचा विचार आवश्यक आहे. विश्वशांती अहिंसा संमेलनाच्या माध्यमातून अहिंसा आणि शांततेचा संदेश सर्वत्र पोहोचेल, असा विश्वास गणिनी श्री ज्ञानमतीजी यांनी व्यक्त केला. सर्व जगाच्या कल्याणाची भावना मनामनांत निर्माण व्हावी, हे ऋषभदेवांचे विचार जगभर पोहोचावेत म्हणून ऋषभदेव मूर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात आली आहे, असे त्या म्हणाल्या.

    मूर्ति निर्माण समितीचे अध्यक्ष रविंद्रकिर्ती स्वामी यांनी मांगीतुंगी परिसराच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य शासनाने मोलाचे सहकार्य केल्याचे सांगितले.

    यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते मुरादाबादच्या तीर्थंकर महावीर विद्यापीठाला भगवान ऋषभदेव आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. कुलगुरू सुरेश जैन यांनी हा पुरस्कार स्विकारला.राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते ‘सर्वोच्च दिगंबर जैन प्रतिमा’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. राष्ट्रपती महोदयांना ग्रंथाची पहिली प्रत भेट देण्यात आली.

    प्रास्ताविकात श्री चंदनामतीजी यांनी, अहिंसा जगाला संदेश देण्यासाठी संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. लोकशाही मूल्य, अहिंसा, दया, करुणा,आध्यात्म हा भारताने जगाला दिलेला ठेवा आहे, असे त्या म्हणाल्या.

    तत्पूर्वी राष्ट्रपती श्री. कोविंद यांचे ओझर विमानतळ येथे राज्यपाल चे.विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले. यावेळीकेंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, पालकमंत्री गिरीष महाजन, जिल्हा परिषद अध्यक्षा शितल सांगळे आदी उपस्थित होते.