04.02.2021: बारीपाड्यासारख्या गावांमुळेच भारत होईल आत्मनिर्भर : राज्यपाल
बारीपाड्यासारख्या गावांमुळेच भारत होईल आत्मनिर्भर : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
धुळे, दि. 4 (जिमाका वृत्तसेवा) : बारीपाडा येथे जल, जंगल, जमिनीचे संवर्धन करण्यात आले आहे. अशा उपक्रमांमुळेच ग्रामीण भारतातील गावे आत्मनिर्भर होवून देश आत्मनिर्भर होण्यास मदत होईल, असा विश्वास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केला.
राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते साक्री तालुक्यातील बारीपाडा येथील पर्यावरण अभ्यास केंद्रात सामूहिक वनहक्क अधिकार पत्राचे वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला सरपंच सुनीता बागूल, बारीपाडा गावाचे शिल्पकार चैत्राम पवार, मोतीराम पवार, विजय पवार उपस्थित होते.
राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, जंगल हे जीवसृष्टीसाठी महत्त्वपूर्ण आहे. त्याचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. मानवाने जंगलाचे रक्षण केल्यास त्याचा लाभ नक्कीच होतो. बारीपाडा येथे चैत्राम पवार यांनी उभे केलेले काम आनंददायी आणि प्रेरणादायी आहे. या गावातील प्रत्येक कुटुंबाला स्वयंपूर्ण बनविण्यासाठी त्यांनी उभारलेले काम कौतुकास्पद आहे.
जमीन, जंगल आणि जल या त्रिसूत्रीवर येथे काम होत आहे. ज्या गावात जमीन आहे, तेथे जंगल उभे राहते, अशा ठिकाणी कधीही पाऊस कमी पडत नाही, असे सांगून ते म्हणाले, श्री. पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्वांना सोबत घेवून गावाचा विकास केला आहे. बारीपाडासारख्या आदिवासी गावात आदिवासी विकास, कृषी, महसूल आणि वन विभागाच्या सहकार्याने गावकऱ्यांनी घडविलेला बदल अनुकरणीय आहे. गाव विकासाचा हा रथ पुढे नेवून अन्य गावांनाही या उपक्रमात सहभागी करून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते सामूहिक वन दावे सनदचे वितरण करण्यात आले. त्यात शेंदवडचे सरपंच वसंत गायकवाड, वाकीचे सरपंच जालमसिंग देसाई, वर्दळी येथील सरपंच काळू अहिरे, प्रतापपूरचे सरपंच ऋतूराज ठाकरे, चरणमाळचे सरपंच ओंकार राऊत, उंभरेचे सरपंच अनंत अकलाडे आणि नांदर्खीच्या सरपंच सुनीता गावित यांनी सनद स्वीकारली.
राज्यपाल महोदयांच्या आगमनानिमित्त आदिवासी बांधवांनी गेर, शिबली आदी नृत्य सादर केली. नृत्याचा आनंद घेताना श्री. कोश्यारी यांनी नृत्यास भरभरुन दाद दिली, तसेच नृत्य करणाऱ्यांचे कौतुक केले. पर्यावरण अभ्यास केंद्राचे प्रमुख श्री. पवार यांनी प्रास्ताविकात बारीपाडा विकासाची माहिती दिली. तसेच पर्यावरण अभ्यास केंद्राने बारीपाडा गावाच्या विकासावर आधारित भरविलेल्या प्रदर्शनाची राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी पाहणी केली.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुषार रंधे, आमदार मंजुळाताई गावित, राजभवनचे प्रधान सचिव संतोषकुमार, उपसचिव श्वेता सिंघल, आदिवासी विकास विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे, जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, धुळे वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक दिगंबर पगार, उपवनसंरक्षक माणिक भोसले, उपजिल्हाधिकारी श्रीकुमार चिंचकर, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे, पिंपळनेरचे अपर तहसीलदार प्रवीण थवील, डॉ. आनंद फाटक यांच्यासह लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बारीपाडा येथील संवर्धित वनास भेट
राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी बारीपाडा येथील संयुक्त वनव्यवस्थापन समितीने संवर्धित केलेल्या वनाची पाहणी केली. वन समितीचे अध्यक्ष चैत्राम पवार यांनी वनराई बंधारा, अन्य कामाची माहिती दिली. ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे संवर्धित केलेल्या वनाचे काम कौतुकास्पद आणि अनुकरणीय आहे, असे राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी सांगितले.
लोकप्रतिनिधींशी साधला संवाद
पर्यावरण अभ्यास केंद्रातील सभागृहात राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी लोकप्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुषार रंधे, आमदार मंजुळाताई गावित, माजी खासदार बापू चौरे, डी. एस. अहिरे, साक्री पंचायत समितीच्या सभापती प्रतिभा सूर्यवंशी यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित होते. राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी लोकप्रतिनिधींकडून विविध योजनांच्या अंमलबजावणीची माहिती जाणून घेतली. तसेच यावेळी राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या उपस्थितीत शबरी विकास महामंडळ आणि देशबंधू फार्मर प्रोड्यूसर कंपनी यांच्यात सामंजस्य करार झाला.
00000
v वन समितीच्या सदस्यांनी राज्यपाल श्री. कोश्यारी यांचे स्थानिक आदिवासी बोली भाषेत गीत सादर करुन स्वागत केले.
v वनसंरक्षक दिगंबर पगार यांनी संयुक्त वनव्यवस्थापन समितीने विकसित केलेल्या वनाची प्रतिमा,
v तर लळिंग कुरणातील धबधब्याची प्रतिमा उपवनसंरक्षक माणिक भोसले यांनी भेट दिली
v लोकप्रतिनिधी यांच्याबरोबर झालेल्या संवाद प्रसंगी लोकप्रतिनिधींनी राज्यपाल श्री. कोश्यारी यांचा बैलगाडीची प्रतिकृती देवून सत्कार केला
00000
जिल्हा माहिती कार्यालय,
प्रशासकीय संकुल, धुळे – ४२४ ००१
वृत्त क्रमांक : 082