बंद

  पद्मशाली चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज संस्थेचा राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते चरखा चालवून शुभारंभ

  प्रकाशित तारीख: October 5, 2018

  महान्यूज

  कौशल्य विकासाचा विणकरांनी लाभ घ्यावा – राज्यपाल चे. विद्यासागर राव

  पद्मशाली चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज संस्थेचा राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते चरखा चालवून शुभारंभ

  पुणे, दि. 5 : हजारो वर्षांची वस्त्रोद्योगाची परंपरा असलेल्या विणकरांनी बदलत्या परिस्थितीत शासनाच्या उद्योगाच्या सोयी, सवलती आणि विविध योजना तसेच कौशल्य विकासाच्या संधीचा फायदा घेत औद्योगिक क्षेत्रे काबीज करायला हवीत, असे प्रतिपादन राज्याचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले.

  पद्मशाली चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज संस्थेचा चरखा चालवून शुभारंभ आणि संस्थेच्या संकेतस्थळाचे अनावरण राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते राजभवन सभागृहात झाले,त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांचा स्मृतिचिन्ह, पुणेरी पगडी, शाल, पुष्पगुच्छ देऊन संस्थेचे विश्वस्त वसंत येमुल आणि हरीश केंची यांनी सत्कार केला.

  ‘जेव्हा जगभर वस्त्र वापरले जात नव्हे तेव्हा भारतातील लोक कापसापासून सूत आणि सुतापासून वस्त्रनिर्मिती करत होते.’ असं सांगून राज्यपाल म्हणाले, ‘जनावरांच्या अंगावरील लोकर काढून त्याची वस्त्रनिर्मिती करणारे ब्रिटिश राज्यकर्ते भारतात आल्यानंतर, झाडावर उगवणारा कापूस आणि त्यातून केली जाणारी वस्त्रनिर्मिती पाहून अचंबित झाले आणि त्यांनी तो कापूस इंग्लंडमध्ये नेऊन तिथे कापड तयार केले आणि ते जगात विकून प्रचंड पैसा कमावला, आपल्याला मात्र हे कधी कळलेच नाही. मात्र भारत ही सुवर्णभूमी आहे हे वस्त्रोद्योगातून ब्रिटिशांना कळले होते.

  ते पुढे म्हणाले, वस्त्रोद्योगात असलेल्या पद्मशाली समाजाने बदलत्या काळात नव्या तंत्रज्ञानाचा आणि जागतिकीकरणाचा विचार करून आपल्या व्यवसायात बदल केला पाहिजे. त्याचबरोबर नव्या पिढीने या बदलती आव्हाने स्वीकारून विविध क्षेत्रात वाटचाल करायला हवी, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

  संस्थेचे अध्यक्ष राहुल येमुल, श्रीकांत कुंदेन, वसंत येमुल, अशोक इप्पा यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन मृणाल केंची यांनी केले. यावेळी पद्मशाली विणकर समाजातील उद्योजक उपस्थित होते.