बंद

  ज्ञानाचा उपयोग समाजहितासाठी व्हावा- राज्यपाल कोश्यारी

  प्रकाशित तारीख: December 19, 2019

  अंतिम दिनांक:31.12.2019

  ज्ञानाचा उपयोग समाजहितासाठी व्हावा- राज्यपाल कोश्यारी

  नागपूर, दि. 19 : आपल्या जवळचे ज्ञान, धन आणि शक्ती यांचा वापर करण्याचे भान असणे आवश्यक आहे. सत्प्रवृत्तीचे लोक ज्ञान, धन आणि शक्तीचा उपयोग हा समाजहितासाठी करतात. तेव्हा या विद्यापिठातून प्राप्त होणाऱ्या ज्ञानाचा उपयोग हा समाजहितासाठी करावा,असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

  येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय भवनाचे उद्घाटन आज राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बजाज इलेक्ट्रिकल्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर बजाज, कुलगुरु डॉ. सिद्धार्थ विनायक काणे, प्र. कुलगुरु डॉ. विनायक देशपांडे, कुलसचिव डॉ. नीरज खटी, माजी कुलगुरु अनुपकुमार आदी मान्यवर उपस्थित होते.

  या इमारतीचे उद्घाटन कोनशिला अनावरण करुन करण्यात आले. विद्यापीठ गायनानंतर दीपप्रज्वलन करुन उद्घाटन सोहळ्याची सुरुवात झाली. आपल्या संबोधनात राज्यपाल कोश्यारी म्हणाले की, संतप्रवृत्तीचे उद्योगपती आणि त्यांनी दिलेले दान हे वंदनीय आहे. ते म्हणाले की, ज्ञान, धन आणि शक्ती या कशा व्यक्तीजवळ आहेत यावर त्याचा उपयोग अवलंबून असतो. त्यामुळे आपण या विद्यापीठातून मिळणाऱ्या ज्ञानाचा वापर समाजाच्या हितासाठी करावा,अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. आपण सर्व नागरिकांनी देशाच्या प्रगतीत काय योगदान देऊ शकतो याबद्दल आदर्श स्थापित करावा. राष्ट्रसंतांच्या विचारांच्या प्रेरणेने पुढे चालत रहा. आपल्या जवळील ज्ञान, संपत्ती आणि शक्तीचा वापर समाजाच्या हितासाठी करावा,असे आवाहन त्यांनी केले.

  शेखर बजाज यांनी यावेळी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या. प्रास्ताविक कुलगुरु डॉ. काणे यांनी केले व विद्यापीठाच्या नव्या प्रशासकीय इमारतीतून विद्यार्थी हिताची जोपासना करण्याचा मनोदय व्यक्त केला. आभार प्रदर्शन प्र कुलगुरु डॉ. देशपांडे यांनी तर कोमल ठाकरे यांनी सूत्रसंचलन केले. कार्यक्रमाचा प्रारंभ व समारोप राष्ट्र्गीताने झाला. या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, प्राध्यापक, शिक्षक, व्यवस्थापन परिषद व अन्य परिषदांचे सदस्य व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.