बंद

  ज्ञानाचा उपयोग करताना देशहिताला सर्वोच्च प्राधान्य द्या राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन

  प्रकाशित तारीख: December 20, 2019

  अंतिम दिनांक:31.12.2019

  ज्ञानाचा उपयोग करताना देशहिताला सर्वोच्च प्राधान्य द्या राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन

  अमरावती, दि. 20 : मूल्यांशिवाय शिक्षण व्यर्थ आहे, याची तरुण पिढीने जाणीव ठेवावी आणि शिक्षणासोबत प्राप्त झालेल्या ज्ञानाचा उपयोग करताना देशहित सदैव डोळ्यासमोर ठेवावे असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

  संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा छत्तिसावा दीक्षांत समारंभ राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून केंद्रीय मानव संसाधन विकास , दुरसंचार, इलेक्ट्रानिक्स, माहिती तंत्रज्ञान खात्याचे राज्यमंत्री संजय धोत्रे उपस्थित होते. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मुरलीधर चांदेकर, प्र- कुलगुरु राजेश जयपूरकर, यांच्यासह विविध अधिष्ठाता, व्यवस्थापन समिती सदस्यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

  दीक्षांत समारंभात पारंपरिक उपदेश करण्यापूर्वी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राज्यपाल म्हणाले, आज विविध पदके आणि पारितोषिके मिळविणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांमध्ये मुलींचे प्रमाण मोठे आहे, हे पाहून आपल्याला अत्यंत आनंद झाला आणि समाधान वाटले. सर्व मुलींचे आपण मनापासून कौतुक करतो. या मुलींच्या कामगिरीचा समाजातील अपप्रवृत्तीना धाक वाटेल.

  आपला देश मोठ्या कष्टाने आणि अनेकांच्या बलिदानानंतर स्वतंत्र झाला आहे. इतिहासात या देशाचा मोठा लौकिक होता. तोच लौकिक पुन्हा मिळवून देण्यासाठी आज प्रयत्न होत असताना विद्यार्थ्यांनी या प्रयत्नांमध्ये सर्व शक्तीनिशी सहभागी होण्याचा संकल्प केला पाहिजे. देशनिष्ठा आणि देशासाठीचे कर्तव्य या सर्वोच्च बाबी आहेत, याची सदैव जाणीव ठेवली पाहिजे. आयुष्यात छोट्या वाटणाऱ्या बाबींना मोठे महत्व असते. छोट्या छोट्या गोष्टी मुल्यांचा संस्कार करतात, असेही राज्यपाल म्हणाले.

  पदवी प्राप्त करण्याचा दिवस हा साफल्याचा दिवस असून आज ज्यांना पदवी प्राप्त होत आहे, त्यांची साधना यशस्वी होण्यास सुरुवात झाली आहे. पुढील आयुष्यातही मेहनतीवर विश्वास ठेवा असे ते म्हणाले.

  यावेळी राज्यपालांनी नेहमी खरे बोला, कर्तव्याचे पालन करा, आत्मोन्नती होईल असे वाचन करा, कर्तव्यापासून विचलित होऊ नका, मानवजातीचा हिताचा व उत्कर्षाचा विचार करुन निर्दोष कर्माचेच आचरण करा व सदाचाराचे अनुकरण करा असा पारंपरिक दीक्षांत उपदेश संस्कृत श्लोकांच्या माध्यमातून केला. आपल्या दीक्षांत भाषणात केंद्रीय मंत्री धोत्रे यांनी विद्यार्थ्यांना प्रबोधन परंपरेशी नाते टिकवून ठेवण्याचे आवाहन केले.

  आज विज्ञान-तंत्रज्ञान- उद्योग या क्षेत्रात नवकल्पनांना महत्व प्राप्त झाले आहे, असे नमूद करुन राज्यमंत्री धोत्रे म्हणाले की, ग्रामीण जीवनातील कल्पकतेतून विद्यार्थ्यांनी नवकल्पनांबाबत प्रेरणा घ्यावी. आज उभ्या असलेल्या समस्या सोडविण्यासाठी आपण संपादन केलेल्या ज्ञानाचा उपयोग करा असे आवाहन त्यांनी केले. व्यावसायिक शिक्षण हा उच्च शिक्षणाचा अविभाज्य भाग असणे तसेच व्यावसायिक शिक्षणात कौशल्याधारीत अभ्यासक्रमाचा समावेश केला जाणे या बाबी महत्वाच्या असल्याचे त्यांनी सांगितले.

  विद्यार्थ्यांना स्थानिक आणि जागतिक प्रश्नाचे भान हवे असे नमूद करुन त्यांनी महिलांवर अन्याय आणि अत्याचार होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले. नैसर्गिक शेती, पर्यावरण रक्षण आदि बाबींचे महत्व त्यांनी अधोरेखित केले.

  कुलगुरु डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी प्रास्ताविक व स्वागतपर भाषण केले. आजच्या समारंभात 158 पारितोषिकांचे वितरण केले जात असून 480 संशोधकाना आचार्य पदवी देवून सन्मानीत केले जात असल्याचे सांगितले.

  यावेळी व्यासपीठावर कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. हेमंत देशमुख आणि विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता आणि व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थितीत होत.