बंद

    जागतिक शांततेसाठी बुद्धविचारांच्या प्रसाराची आवश्यकता – राज्यपाल चे. विद्यासागर राव

    प्रकाशित तारीख: December 6, 2018

    महान्यूज
    वृ.वि. 3875

    दि. 6 डिसेंबर, 2018

    जागतिक शांततेसाठी बुद्धविचारांच्या प्रसाराची आवश्यकता

    – राज्यपाल चे. विद्यासागर राव

    मुंबई, दि. 6 : शांतता, सौहार्द, ज्ञान आणि करुणा या तत्त्वज्ञानाचा आधार असलेला बौद्ध धर्म हा भारताच्या महान आध्यात्मिक परंपरांचा प्रसारक आहे. आजची जागतिक परिस्थिती पाहता जगाला बुद्धविचारांची आवश्यकता आहे, असे मत राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज येथे व्यक्त केले.

    के. जे. सोमय्या सेंटर फॉर बुद्धीजम स्टडीजच्या 25 वर्षपूर्तीनिमित्त ‘एम्बडींग कंम्पॅशन : अवलोकितेस्वरा इन बुद्धिस्ट आर्ट’ या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. सोमय्या विद्याविहारने चीनमधील हँगझोऊ बुद्धिस्ट ॲकॅडमीच्या सहकार्यातून या परिषदेचे आयोजन केले आहे. याप्रसंगी सोमय्या विद्याविहारचे अध्यक्ष समीर सोमय्या, हँगझोऊ बुद्धिस्ट ॲकॅडमीचे सहाय्यक रेक्टर प्रा. हुआँग झेंग, सोमय्या विद्याविहार ट्रस्टच्या विश्वस्त लीलाबेन कोटक उपस्थित होते.

    प्राचीन काळापासून भारताला जगातील एक महान संस्कृतींमध्ये गणले जाते, असे सांगून भारत म्हणजे इतिहास, संस्कृती, विश्वास आणि तत्त्वज्ञानाचे भांडार आहे. ‘द केस फॉर इंडिया’ या पुस्तकात अमेरिकेतील तत्त्वज्ञ आणि इतिहासतज्ज्ञ विल ड्यूरंट यांनी भारताला अमेरिकेचे वांशिक मातृत्व, संस्कृतला युरोपच्या भाषांची जननी, गणित, अमेरिकन तत्वज्ञान, ख्रिस्ती धर्माचे तत्वज्ञान हे बुद्ध तत्वज्ञानावर आधारित असून भारत हीग्राम स्वराज्य आणि लोकशाहीची जननी आहे, असे नमूद केले आहे.

    महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करुन राज्यपाल श्री. राव म्हणाले, सोमय्या विद्याविहारने उच्च शिक्षणाच्या पारंपरिक अभ्यासक्रमांसोबतच धर्म आणि संस्कृतीविषयक अभ्यासाच्या संस्थेची स्थापना करुन वेगळेपण निर्माण केले आहे. बौद्ध तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी सोमय्या विद्याविहारने स्थापन केलेल्या केंद्रामुळे या संस्थेला आंतरराष्ट्रीय स्तरावर एक वेगळी ओळख प्राप्त झाली आहे.

    भारतीय संस्कृतींनी नेहमी विविध विचार, विश्वास, नवीन कल्पनांचे स्वागत केले आहे. भारताची भूमी बौद्ध, जैन आणि शिख धर्म आणि इतर अनेक पंथ तसेच विश्वास यांचे जन्मस्थळ बनली. भारताने मुस्लिम, ख्रिश्चन, ज्यू, पारशी आणि इतर धर्मांचेच नव्हे तर नास्तिक विचारांचेही स्वागत केले. भारतातून आशियासह इतर देशांमध्ये बौद्ध भिक्खू तसेच व्यापारी येथील ज्ञान आणि शिकवणच नव्हे तर कला, शिल्पकला, ध्यान पद्धती, भाषा आणि मार्शल आर्ट चे ज्ञान देखील बरोबर घेऊन गेले. भारतामधील ‘विपश्यना’ ही जगभरातील सर्वात लोकप्रिय ध्यान पद्धतींपैकी एक बनली आहे.

    चीनमध्ये झालेला बौद्ध धर्माचा प्रसार हा मानवी इतिहासातील महत्वाचा अध्याय आहे. धर्म, संस्कृती आणि तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये एक हजार वर्षाहून अधिक कालावधीपासून भारतीय आणि चीनी संस्कृतीचा सहयोग राहिला. चीनच्या संस्कृतीवर भारतीय संस्कृतीचा प्रभाव राहिला आहे. चीनी अभ्यासक आणि लेखकांनी बौद्ध साहित्याचा चीनी भाषेत अनुवाद केला आहे. मूळ संस्कृतमध्ये सध्या उपलब्ध नसलेला मोठा मजकूर सध्या चीनी भाषेत जतन करण्यात आला आहे. हे ग्रंथ आपल्या प्राचीन वारश्याचे एक मौल्यवान भांडार आहेत.

    सातव्या शतकातील चीनी प्रवासी तसेच साधू असलेल्या हु ऑन त्स्यँगने केलेल्या भारतातील प्रवास वर्णनावरुन आज तत्कालीन भारतीय सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक परिस्थितीचा अभ्यास केला जातो.

    प्रा. हुआँग झेंग म्हणाले, भारत आणि चीनी संस्कृतीचा इतिहास खूप जुना आहे. दोन्ही संस्कृतींचा एकमेकांवर प्रभाव आहे. 1662 वर्षापूर्वी चीनमधील हँगझोऊ प्रांतात बांधण्यात आलेल्या प्रसिद्ध लिंगिन मंदिराची स्थापना भारतीय बौद्ध साधू हुइली यांनी केली होती. भारतातून बौद्ध धर्माचा प्रसार चीनमध्ये झाला. चौथ्या शतकापासूनच चीनी तत्वज्ञांनी भारतामध्ये प्रवास करुन येथील तत्त्चज्ञानाचा अभ्यास केला. येथील ग्रंथ, अध्यात्म विषयक तत्वज्ञानाच्या लेखनाचे अनुवाद करुन त्याला चीनमध्ये प्रसिद्धी मिळवून दिली. बुद्ध धर्मप्रसारामुळे दोन्ही देशात जवळिकीचे बंध निर्माण झाले,असेही ते म्हणाले.

    सोमय्या विद्याविहारचे अध्यक्ष श्री. सोमय्या म्हणाले, संस्थेने स्थापन केलेल्या बौद्ध धम्माचे अभ्यासकेंद्र, जैन धर्माचे अभ्यासकेंद्र तसेच भारतीय संस्कृती अभ्यास केंद्राला अनेक नामांकित संस्थांनी मान्यता दिली आहे. के. जे. सोमय्या सेंटर फॉर बुद्धीस्ट स्टडीजला प्राचीन भारतीय संस्कृतीच्या अभ्यासाचे स्थायी केंद्र म्हणून मुंबई विद्यापीठाने मान्यता दिली आहे. याशिवाय तत्त्वज्ञान, पाली आणि संस्कृत च्या अभ्यासासाठीही या केंद्राला मान्यता दिली आहे. विद्याविहारच्या भारतीय संस्कृती पीठाला कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ तसेच मुंबई विद्यापीठाने उच्च अभ्यासाक्रमांसाठी मान्यता दिली आहे. विद्याविहारकडून भारतीय संस्कृतीला जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जातात, असेही ते म्हणाले.

    यावेळी सोमय्या विद्याविहारच्या कार्यकारी संचालक डॉ. सुप्रिया राय यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रोव्होस्ट प्रा. व्ही. एन. राजशेखरन पिल्लई यांनी स्वागत केले. सोमय्या ट्रस्टचे सचिव ले. जनरल जगबीर सिंग यांनी आभार मानले. या परिषदेसाठी भारतासह चीन, हाँगकाँग, जपान, नेदरलँड,थायलंड, जर्मनी, पोलंड, कंबोडिया आदी देशातील बुद्ध विचारांचे विद्वान तसेच अभ्यासक, सोमय्या शिक्षणसंस्थेतील प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.