ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांची गरज नवपदवीधर विद्यार्थ्यांनी पूर्ण करावी- उपराष्ट्रपती
Mahanews
शिर्डी, दि. 25 :- ग्रामीण भागात चांगल्या आरोग्य सुविधांची गरज असून आरोग्य क्षेत्रातील पदवीप्राप्त विद्यार्थ्यांनी ही गरज पूर्ण करावी आणि ग्रामीण भागात सेवा द्यावी, अशी अपेक्षा उपराष्ट्रपती एम. वैंकेया नायडू यांनी व्यक्त केली. तसेच आज देशात आरोग्य क्षेत्रात नवनवीन संकल्पनांमुळे आणि चांगल्या उपचार पद्धतीमुळे भारत आरोग्य पर्यटन हब बनला आहे. बाहेरील देशांचे रुग्ण येथे उपचारासाठी येतात. ही आपल्या आरोग्य क्षेत्रातील विकासाची पावती आहे, असे ते म्हणाले.
प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अभिमत विद्यापीठाचा तेरावा पदवीप्रदान कार्यक्रम उपराष्ट्रपती श्री. नायडू यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्यावेळी पदवीप्राप्त स्नातकांना उद्देशून दीक्षांत भाषण करताना ते बोलत होते. यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, कुलपती डॉ. विजय केळकर, प्र. कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील, कुलगुरु डॉ. वाय. एम. जयराज, प्रसिद्ध मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. अशोक पनगारिया आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
यावेळी उपराष्ट्रपती श्री. नायडू यांच्या हस्ते विद्यापीठात विविध विद्याशाखांत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना सुवर्णपदक देऊन गौरवण्यात आले. तसेच डॉ. पनगारिया यांना डॉक्टर ऑफ सायन्स पदवीने सन्मानित करण्यात आले.
यावेळी श्री. नायडू म्हणाले, लोणीसारख्या ग्रामीण भागात आरोग्य क्षेत्रात इतक्या चांगल्या प्रकारे काम सुरु आहे, याचे खरोखर समाधान आहे. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी सहकाराची मुहूर्तमेढ रोवली. पद्मभूषण बाळासाहेब विखे यांनी या कामाचा अधिक विस्तार केला. येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील विविध क्षेत्रातील दरी मिटवण्यासाठी पुढे आले पाहिजे. महात्मा गांधींनी ‘खेड्यांकडे चला’ असा नारा दिला. मात्र, आज परिस्थिती वेगळी दिसत आहे. ग्रामीण भागातून ओढा शहरांकडे स्थलांतरीत होताना दिसतो आहे. हे चित्र आपल्याला बदलायला हवे, त्यासाठी तरुण पिढीची मोठी जबाबदारी असल्याचे ते म्हणाले.
सेवाभाव हा स्थायीभाव झाला पाहिजे. आपल्या करियरच्या सुरुवातीला आपण तो अंगी बाळगला तर यापेक्षा देशप्रेमाची भावना दुसरी काय असू शकेल, अशी भावना व्यक्त करुन श्री. नायडू यांनी आरोग्य आणि ग्रामविकास क्षेत्रात अधिक काम करण्याची गरज व्यक्त केली.
आजच्या पदवीप्रदान सोहळ्यात सुवर्णपदक जिंकलेल्यांत मुलींची संख्या जास्त असल्याचा आवर्जून उल्लेख करीत श्री. नायडू यांनी आपल्या देशाने पुराणकाळापासून स्त्रीयांना महत्वाचे स्थान दिल्याचे सांगितले. ही परंपरा या विद्यार्थिनी पुढे नेत असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला. समाजातील सर्व घटकांची प्रगती झाली तरच आपण विकसित झाले, असे मानता येईल. आरोग्य क्षेत्रातील पदवी प्राप्त झाल्यानंतर ग्रामीण भागात किमान तीन वर्षे काम केले पाहिजे. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना बळकटी देण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
प्रवरा इन्स्टिट्यूट हे शिक्षण क्षेत्रातील ‘युनिक मॉडेल’ असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. सध्या गरजेवर आधारित संशोधन, ज्ञान आणि विचारांचे आदानप्रदान होण्याची गरज व्यक्त करुन श्री. नायडू म्हणाले, हक्काची आणि किमान दरात आरोग्यसुविधा ही आजची गरज आहे, ती प्रवरा संस्थेने पूर्ण करावी.
राज्यपाल श्री. राव यांनी, आरोग्य क्षेत्रातील संशोधन वाढले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. पदवीप्रदान कार्यक्रमात मुलींनी सर्वाधीक सुवर्णपदके जिंकली आहेत. मात्र, हे विद्याथी पुढे संशोधन क्षेत्रात अधिक संख्येने आले पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. जागतिक दर्जाचे डॉक्टर्स येथे असूनही आपण संशोधन क्षेत्रात जास्त दिसत नाही. नोबेल पारितोषिक विजेत्यांमध्ये आपल्या वैद्यकतज्ज्ञांचे नाव असायला हवे, तसे काम व्हायला हवे. एकविसावे शतक हे महिलांचे आहे. विविध क्षेत्रात महिला दिसत आहेत. मात्र त्यांना अधिक प्रोत्साहन देण्याची गरज आहे, शिक्षण, उद्योग क्षेत्रात त्यांनी पुढे आले पाहिजे, अशी अपेक्षा असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
श्री. विखे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी उपराष्ट्रपती व राज्यपाल यांचे हस्ते प्रवरा ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारत व ग्रामीण वैद्यकिय महाविद्यालयाचे रिमोट द्वारे उद्घाटन करण्यात आले.