बंद

    कुशल कामगारांच्या कामाला पाठबळ मिळणे आवश्यक – राज्यपाल चे विद्यासागर राव

    प्रकाशित तारीख: July 15, 2019

    महान्यूज 15 जुलै, 2019

    वृ.वि.1601

    जागतिक युवा कौशल्य दिन

    कुशल कामगारांच्या कामाला पाठबळ मिळणे आवश्यक

    – राज्यपाल चे विद्यासागर राव

    मुंबई दि. 15 : आज भारतात जगातील सर्वोत्कृष्ट माहिती तंत्रज्ञान अभियंते आणि डॉक्टर निर्माण होत आहे. पण येणाऱ्या काळात जगाला सर्वोत्तम कारागीर, सुतार, प्लंबर, नर्स, पॅरामेडिकोज, शेतकरी देऊ शकण्याची व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे. आपले बरेच कुशल कामगार इतर देशांमध्ये बऱ्याच वर्षांपासून सेवा देत आहेत. आपल्या देशातील प्रत्येक कुशल कामगारांच्या कामाला पाठबळ मिळणे आवश्यक असल्याचे राज्यपाल चे.विद्यासागर राव यांनी सांगितले.

    जागतिक युवा कौशल्य‍ दिनाच्या निमित्ताने राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून उत्तीर्ण होणऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना पदवी प्रदान करणे, उत्कृष्ट औदयोगिक प्रशिक्षण संस्था व सहभागी औदयोगिक संस्थांना सन्मानित करण्याचा कार्यक्रम आज सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री संभाजी पाटील- निलंगेकर, कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील उपस्थित होते.

    राज्यपाल श्री.राव यांनी आपल्या भाषणात सर्वप्रथम जागतिक युवा कौशल्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे मजबुतीकरण आणि उन्नतीकरण करून शेतकऱ्यांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण प्रदान करण्यासाठी कौशल्य विकास व उदयोजकता विभागाने लक्षणीय पुढाकार घेतला आहे. 2015 मध्ये कौशल्य भारत अभियानाची सुरूवात करताना, भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारताला जगाची कौशल्य राजधानी बनविण्याचा संकल्प व्यक्त केला होता.या दिशेने वाटचाल म्हणून भारत सरकारने २०२२ पर्यंत ४०० दशलक्ष लोकांना विविध उपक्रमांद्वारे कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला. 2022 पर्यंत ४.५ कोटी युवकांना कौशल्य प्रशिक्षण देण्याचे लक्ष्य महाराष्ट्र पूर्ण करेल अशी अपेक्षा राज्यपाल श्री.राव यांनी व्यक्त केली.

    आपल्या निम्म्याहून अधिक लोकसंख्येसाठी शेती हे साधन रोजगारासाठी उपलब्ध आहे. अन्न उत्पादन, फलोत्पादन, डेअरी आणि मत्स्यपालन या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्रात प्रचंड क्षमता आहे. या क्षेत्रातील तरुणांना योग्य कौशल्य प्रशिक्षण देऊन महाराष्ट्र संपूर्ण जगामध्ये शेतीमधील कौशल्य आणि मनुष्यबळ प्रदान करू शकेल. यासाठी कृषी विज्ञान केंद्रे, कृषी महाविद्यालये आणि विद्यापीठे यांची भूमिका महत्त्वपूर्ण असेल. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे मजबूतीकरण आणि उन्नतीकरण करुन शेतकऱ्यांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देण्यासाठी कौशल्य विकास विभागाने पुढाकार घेतला आहे याचा आनंद असल्याचे राज्यपाल यावेळी म्हणाले.

    आज भारतासमोर आव्हान आणि संधी दोन्ही आहेत. २०२२ पर्यंत कौशल्य विकास झालेल्या राष्ट्रांमध्ये भारताची ओळख ही जगातील सर्वात तरुण राष्ट्र म्हणून असणार आहे. तर येणाऱ्या काळात जर आपण शक्य तितक्या तरुणांना विविध कौशल्य प्रदान करू शकलो तर याचा लाभ भारताला निश्चित मिळेल असा विश्वास राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी व्यक्त केला. बऱ्याच वर्षांपासून, आयटीआय जुन्या आणि कालबाह्य अभ्यासक्रमामुळे मागे राहिले. म्हणून आजच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना त्यांच्या विकासासाठी आणि बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन त्यांच्या उन्नतीसाठी आर्टिफिशियल इंटेलिजेंस, बिग डेटा अॅनालिसिस, रोबोटिक्स, 3 डी प्रिंटिंग आणि इतरसारख्या भविष्यातील क्षेत्रातील कौशल्य प्रदान करणे आवश्यक आहे. प्रशिक्षणाच्या पदोन्नतीसाठी मोठी वाढ होणे आवश्यक आहे यासाठी सर्व औद्योगिक संस्थांनी युवकांसाठी प्रशिक्षणाची सोय सुनिश्चित करणे आवश्यक आहे. आपल्या तरुणांना देखील सरकारी विभाग, सार्वजनिक क्षेत्र, खाजगी क्षेत्र आणि नॉन-गव्हर्नमेंटल संस्थांमध्ये प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणे आवश्यक असल्याचे मत राज्यपाल श्री.राव यांनी व्यक्त केले.

    सर्वाधिक स्टार्टअप

    कौशल्य विकास मंत्री पाटील- निलंगेकर म्हणाले, आयटीआय विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ कार्यक्रम आयोजित करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले असून याची नोंद एशिया आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. आज महाराष्ट्राने बनवलेले कौशल्य धोरण अत्यंत उपयुक्त असे ठरत असून गेल्याच आठवडयात झालेल्या रँकिगमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक स्टार्ट अप आल्याची नोंद आहे. आज शासकीय आयटीआयचे आधुनिकीकरण होत असताना कॉर्पोरेट कंपन्या आयटीआयला ॲडॉप्ट न करता आयटीआयबरोबर हँड होल्डिंग करीत आहेत ही जमेची बाजू आहे. आज आयटीआयचे सक्षमीकरण करीत असताना आयटीआय परीक्षा ऑनलाईन करण्यात आल्या आहेत तर रोजगारक्षम अभ्यासक्रम तयार करण्यात महाराष्ट्राला यश आले आहे.

    राज्यमंत्री डॉ. पाटील म्हणाले, शेतीला कौशल्याची जोड मिळणे आवश्यक आहे. आजही शेतीवरच आपली अर्थव्यवस्था अवंलबून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारणे आवश्यक आहे. गटशेतीचे प्रशिक्षण, गटशेतीला चालना यामुळे शेतकऱ्यांना मदतच होणार आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत शेतकऱ्यांना देण्यात येणारे प्रशिक्षण नक्कीच महत्वपूर्ण आहे. आज आयटीआय म्हणजेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था या कौशल्य विकासाचा कणा आहेत. आज 417 शासकीय आणि 537 खाजगी आयटीआय महाराष्ट्रात असून यावर्षी या आयटीआयमधील प्रवेश क्षमता जवळपास 65 हजारने वाढणार आहे. तर या आयटीआयमध्ये शिकविले जाणारे अभ्यासक्रम बदलून काळानुरुप आणि रोजगार मिळवून देणारे अभ्यासक्रम आणण्यात आले आहेत.आयटीआयचे सक्षमीकरण करण्यात कार्पोरंट कंपन्याचा सहभाग अत्यंत महत्वाचा ठरला आहे.

    या कार्यक्रमाला अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, याच महामंडळचे उपाध्यक्ष संजय ऊर्फ संजोय पवार, कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, ग्राम विकास विभागाचे सचिव असिम कुमार गुप्ता, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अनिल जाधव, विविध कॉर्पोरेट कंपन्याचे मान्यवर आदी उपस्थित होते.