बंद

    आदिवासी विकास भागाच्या विकासासाठी शासन प्रयत्नशिल – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

    प्रकाशित तारीख: February 20, 2020

    आदिवासी विकास भागाच्या विकासासाठी शासन प्रयत्नशिल – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

    राज्यपालांच्या हस्ते नंदुरबारमधील भगदरी येथील सांस्कृतिक भवनचे उद्घाटन

    नंदुरबार : जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भागाच्या विकासासाठी राज्य व केंद्र सरकार प्रयत्नशील असून त्यासाठी सर्व सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

    ते भगदरी येथे आदिवासी विकास उपयोजनेतून बांधण्यात आलेल्या सांस्कृतिक भवनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी, खासदार हिना गावीत, राजभवनचे प्रधान सचिव संतोष कुमार, जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अविशांत पंडा उपस्थित होते.

    श्री.कोश्यारी म्हणाले, पीएमकिसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर अर्थसहाय्य जमा होत आहे. राज्य शासनानेदेखील महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजना जाहीर केलेली आहे. घरोघरी शौचालय, वीज, पाणी देण्याचा प्रयत्न होत आहे. 2025 पर्यंत प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी देण्यात येणार आहे. पूर बाधीत शेतकऱ्यांना प्रती हेक्टर आठ हजार रुपये मदत देण्यात येत आहे.

    अक्कलकुवा आणि मोलगी येथील दुर्गम भागात वीज पोहोचविण्यासाठी महावितरणकडून 11 किलोमीटर वीज वितरण वाहिनीचे काम पूर्ण झाले आहेत. उर्वरीत 20 किलोमीटर वाहिनीच्या कामासाठी वनक्षेत्रातील मंजुरी केंद्र सरकारकडून मिळण्यासाठी आपण प्रयत्न करु, असे त्यांनी सांगितले. सहा महिन्यात भगदारी परिसरात दुर्गम भागातील नागरीकांना वीज देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

    आपले स्वत:चे घर दुर्गम भागात असल्याचे सांगून राज्यपाल म्हणाले, या भागातील नागरीकांना भेटल्यावर कुटुंबियांना भेटल्याचे समाधान मिळते. गावातील समस्या जाणून घेण्यासाठी ग्रामीण भागाला भेट देत आहे. ग्रामीण भागाच्या समस्या स्वत:च्या समस्या वाटतात, असे त्यांनी सांगितले. गावाला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी व्यसनापासून नव्या पिढीने दूर राहावे आणि गावातील विवाद बाजूला सारुन एकोप्याने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

    पालकमंत्री म्हणाले, गावाच्या समस्या जाणून घेण्यासाठी राज्यपाल महोदय ग्रामीण भागात आले असून त्यांच्या दौऱ्याने या भागातील विकासाला गती मिळेल. यावेळी खासदार गावीत यांनी देखील विचार व्यक्त केले.

    तत्पूर्वी, श्री.कोश्यारी यांनी हेडगेवार सेवा समिती संचलीत कृषी विज्ञान केंद्राच्या कामाची माहिती घेतली व नागरीकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. भगदरी येथील अंगणवाडी केंद्र व जलयुक्त शिवार योजनेतंर्गत माती नाला बंधाऱ्याला त्यांनी भेट दिली. अंगणवाडीत महिलांशी संवाद सांधताना मुलाना चांगले शिक्षण देण्याचे आवाहन त्यांनी केले. आदिवासी समाजातून चांगले नेतृत्व तयार व्हावे, चांगले अधिकारी व्हावेत यासाठी शिक्षण आवश्यक असल्याचे ते म्हणाले यावेळी सरपंच प्रमिला वसावे उपस्थित होत्या.

    आंकाक्षित जिल्हा कार्यक्रम अंतर्गत आढावा

    राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी आंकाक्षित कार्यक्रमातंर्गत विकास कामाचा आढावा घेतला. आरोग्य सुविधावर विशेष भर द्यावा. कमी वजनाच्या मुलाच्या आरोग्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे व त्याची नियमीत वैद्यकीय तपासणी करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

    प्रशासनाच्या सुविधेसाठी दुर्गम भागात नव्या ग्रामपंचायतीचा प्रस्ताव सादर करावा. जिल्हा परीषद शाळेतील सुविधाकडे विशेष लक्ष द्यावे. मानव विकास निर्देशांकात प्रगती साधण्यासाठी अधिकाऱ्यांनी एकत्रित प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी राज्यपालांनी जलयुक्त शिवार, प्रधानमंत्री आवास योजना, आरोग्य विभागातील रिक्त पदे आणि प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आदी विषयांची माहिती घेतली.

    बैठकीनंतर श्री.कोश्यारी यांनी पशुसंवर्धन विभागामार्फत देण्यात आलेल्या गोट युनिट आणि पोल्ट्रीफार्मची पाहणी केली. रोषनी स्वंयसहायता बचत गटातील महिलांना भाजीपाला उत्पादन वाढविण्यासाठी 25 हजार रुपये अर्थसहाय्य देण्याचे त्यांनी जाहीर केले. जलयुक्त शिवार योजनेतून बांधण्यात आलेल्या सिमेंट नाला बंधाऱ्याची त्यांनी पाहणी केली.