Speech- 23.09.2024: डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ संपन्न
23.09.2024: राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचा वार्षिक दीक्षांत समारंभ मुंबई विद्यापीठाच्या सर कावसजी जहांगीर सभागृहात पार पडला. यावेळी राज्यपालांच्या हस्ते पीएचडी, पदव्युत्तर पदवी तसेच पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र, पदक देऊन सत्कार करण्यात आला. भारतीय व्यवस्थापन संस्था नागपूरचे संचालक भिमराया मेत्री, डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रजनीश कामत यावेळी उपस्थित होते. दीक्षांत समारंभात विज्ञान आणि तंत्रज्ञान, वाणिज्य आणि व्यवस्थापन, मानवता विद्या शाखा, आंतरविद्या शाखा अशा विविध शाखांमधून ११३० पदवीधरांना पदवी प्रदान करण्यात येत असून त्यापैकी ७७८ पदवीधर, ३४१ पदव्युत्तर आणि ११ जणांनी पीएच.डी. पदवी प्राप्त केल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. प्रातिनिधिक स्वरूपात राज्यपालांच्या हस्ते काही विद्यार्थ्यांना पदवी तर विविध परीक्षांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली. या दीक्षांत समारंभात ५३ टक्के विद्यार्थिनी असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.