31.07.2024: राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना राज्यपालपदाची शपथ
31.07.2024: झारखंडचे राज्यपाल असलेले सी पी राधाकृष्णन यांनी आज महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली. राजभवनातील दरबार हॉल येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांना त्यांना राज्यपाल पदाची शपथ दिली. शपथविधीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपाल राधाकृष्णन यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे २१ वे राज्यपाल आहेत. शपथविधी सोहळ्याला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, अतिरिक्त मुख्य सचिव राजशिष्टाचार मनिषा म्हैसकर व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सुरुवातीला मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी राधाकृष्णन यांच्या नियुक्तीसंदर्भातील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढलेली अधिसूचना वाचून दाखवली. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व राज्यगीताने झाली तर सांगता राष्ट्रगीताने झाली. शपथविधी नंतर राज्यपालांना भारतीय नौदलातर्फे मानवंदना देण्यात आली.