30.05.2025: राज्यपालांच्या उपस्थितीत गोवा व तेलंगणा राज्य स्थापना दिवस साजरा

30.05.2025: महाराष्ट्र राजभवन येथे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत गोवा राज्य स्थापना दिवस (३० मे) तसेच तेलंगणा राज्य स्थापना दिवस (२ जून) संयुक्तरित्या साजरा करण्यात आला. उभय राज्यांचे राज्य स्थापना दिवस हे भारत सरकारच्या ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमाचा भाग म्हणून साजरे करण्यात आले. गोवा राज्य स्थापना दिनाचे आयोजन महाराष्ट्र राजभवनाने नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ (स्वारातीम) यांच्या सहकार्याने केले होते, तर तेलंगणा राज्य स्थापना दिनचे मुंबई आंध्र महासभा व जिमखाना या संस्थेच्या सहकार्याने करण्यात आले. यावेळी गोवा आणि तेलंगणा राज्यांच्या लोकसंस्कृतीचे लोकगीते आणि नृत्याच्या माध्यमातून सादरीकरण करण्यात आले. गोवा राज्याचे सांस्कृतिक सादरीकरण स्वारातीम विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी केले, तर तेलंगणाच्या संस्कृतीचे सादरीकरण गृहिणींनी तसेच कुचिपुडी नृत्यांगना नृत्य शिरोमणी नादिया यांनी केले. यावेळी दोन्ही राज्यांचा इतिहास आणि वारसा दर्शविणारे लघुपट देखील दाखवण्यात आले. राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, स्वारातीमचे कुलगुरु डॉ. मनोहर चासकर, प्रकुलगुरु डॉ अशोक महाजन, मुंबई आंध्र महासभा आणि जिमखान्याचे अध्यक्ष एम. कोंडा रेड्डी, सरचिटणीस यापुरम वेकटेश्वर, राज्यपालांचे उपसचिव एस. राममूर्ती, स्वारातीम विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य व विद्यार्थी आणि मुंबईत राहणारे मूळचे तेलंगणा राज्याचे गणमान्य नागरिक उपस्थित होते. राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी स्वागतपर भाषण केले तर कक्ष अधिकारी जयेश ठाकूर यांनी आभार मानले.