29.02.2024: राज्यपालांची अमेरिकेतील तसेच राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरुंसोबत बैठक
29.02.2024: अमेरिका व महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये शैक्षणिक व संशोधन सहकार्य वाढावे या दृष्टीने अमेरिकेतील तसेच राज्यातील विविध विद्यापीठांच्या कुलगुरुंची तसेच विद्यापीठ प्रमुखांची बैठक राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज राजभवन मुंबई येथे संपन्न झाली.
इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल एजुकेशन (IIE) या संस्थेच्या पुढाकाराने विद्यापीठ प्रमुखांच्या या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला अमेरिकेचे मुंबईतील वाणिज्यदूत माईक हँकी, अमेरिकेतील १४ विद्यापीठांचे अध्यक्ष व प्रतिनिधी तसेच राज्यातील काही पारंपरिक विद्यापीठांचे कुलगुरु, शासनाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, अमेरिकन दूतावासातील सांस्कृतिक सहकार्य प्रतिनिधी सीता रायटर, IIE चे अध्यक्ष विवेक मनसुखानी, सह अध्यक्ष जेसन सिझ, आदी उपस्थित होते.