27.07.2024: राज्यपालांच्या उपस्थित ‘सीएसआर एक्सलन्स’ पुरस्कार प्रदान
27.07.2024: आपल्या सामाजिक दायित्व निधीतून शिक्षण, आरोग्य, कौशल्य, पर्यावरण, महिला सक्षमीकरण आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उद्योग समूह व सार्वजनिक उपक्रमांचा आज राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन मुंबई येथे ‘सीएसआर एक्सलन्स’ पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी, भारतीय सीएसआर दशकपूर्ती समितीचे अध्यक्ष डॉ हुझेफा खोराकीवाला, निवृत्त भाप्रसे अधिकारी डॉ भास्कर चटर्जी तसेच विविध उद्योग व सार्वजनिक उपक्रमांचे प्रमुख व सीएसआर प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते गोदरेज समूहाचे अध्यक्ष नादीर गोदरेज व ‘कोल इंडिया’च्या सीएसआर प्रमुख रेणू चतुर्वेदी यांचा सत्कार करण्यात आला. अजंता फार्मा, एलआयसी, गेल इंडिया, हिंदुस्थान लिवर, महिंद्रा अँड महिंद्रा, नवनीत प्रकाशन, एनटीपीसी, स्टेट बँक ऑफ इंडिया यांचे प्रतिनिधींचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला. डॉ भास्कर चटर्जी यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. यावेळी राज्यपालांच्या हस्ते ‘भारतीय CSR के दस साल : अगले दस साल बेमिसाल’ या पुस्तकाच्या आवरणाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन ‘इंडियन CSR वन डिकेड सेलिब्रेशन कमिटी’ या संस्थेतर्फे करण्यात आले.