27.01.2025: वांशिक नरसंहार स्मृती दिनानिमित्त राज्यपालांची निरपराध ज्यू मृतात्म्यांना श्रद्धांजली
27.01.2025: राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज ज्यू लोकांचे मुंबईतील प्रार्थनास्थळ असलेल्या केनेसेथ इलियाहू सिनेगॉग येथे जाऊन दुसऱ्या महायुद्धात हत्या करण्यात आलेल्या लाखो निरपराध ज्यू लोकांच्या स्मृतींना आपली श्रद्धांजली वाहिली. जागतिक वांशिक नरसंहार स्मृती दिनानिमित्त या स्मृतीसभेचे आयोजन जेकब ससून ट्रस्टच्या वतीने करण्यात आले होते. दुसऱ्या महायुद्धात निरपराध ज्यू लोकांचा जो नरसंहार झाला, त्या इतकी दुर्दैवी आणि क्रूर घटना मानव जातीच्या इतिहासात कधीही झाली नाही. मात्र सुसंस्कृत समाजाने बदल्याच्या भावनेने पेटून न उठता गतकाळ मागे सारुन समोरच्या व्यक्तीचे हृदय परिवर्तन केले पाहिजे, असे यावेळी राज्यपालांनी सांगितले. या स्मृतीसभेला इस्रायलचे मुंबईतील वाणिज्यदूत कोबी शोशानी, जर्मनीचे मुंबईतील वाणिज्यदूत एकिम फेबिग, अमेरिकन दूतावासातील वरिष्ठ अधिकारी मायकल श्रुडर, जेकब ससून ट्रस्टचे अध्यक्ष सॉलोमन सोफर, विविध देशांचे वाणिज्यदूत तसेच ज्यू धर्मीय लोक उपस्थित होते.