25.03.2025: राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्य सैनिकांच्या सन्मानार्थ कृतज्ञता भिंतीचे भूमिपूजन

25.03.2025: राज्यपाल सी पी राधाकृष्णन व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मंत्रालयाशेजारील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याशेजारी देशातील स्वातंत्र्य सैनिकांच्या सन्मानार्थ कृतज्ञता भिंतीच्या निर्मितीसाठी भूमिपूजन करण्यात आले. चक्र व्हिजन इंडिया फाउंडेशन ट्रस्टच्या पुढाकाराने या कृतज्ञता भिंतीची (Tribute Wall: The Wall of Honour for Freedom Fighters) निर्मिती केली जात आहे. भूमिपूजन सोहळ्याला विधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, पुडुचेरी विधानसभेचे अध्यक्ष एम्बलम आर सेल्वम, राज्याचे माजी मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार श्रीकांत भारतीय, चक्र व्हिजन इंडिया फाउंडेशन ट्रस्टचे संस्थापक चक्र राजशेखर, उपाध्यक्ष गगन महोत्रा आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना चक्र व्हिजन ट्रस्टचे संस्थापक चक्र राजशेखर यांनी कृतज्ञता भिंत निर्मितीची संकल्पना स्पष्ट केली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी विविध राज्यांमधील स्वातंत्र्य सैनिकांनी योगदान दिले आहे. परंतु इतर राज्यांमधील स्वातंत्र्य सैनिकांच्या योगदानाची लोकांना कल्पना नसते. ७० फूट लांब व दहा फूट रुंद अश्या प्रस्तावित भिंतीवर देशभरातील स्वातंत्र्य सैनिकांची नावे कोरलेली असतील असे त्यांनी सांगितले. या ठिकाणी क्यूआर कोड असेल ज्यामुळे प्रत्येक स्वातंत्र्य सैनिकांची माहिती मिळू शकेल असे त्यांनी सांगितले. तामिळनाडू व महाराष्ट्राचे संबंध पूर्वापार अतिशय घनिष्ट असून छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील तामिळनाडूला भेट दिली होती व तंजावूर येथील सरस्वती ग्रंथालय आजही उभे असल्याचे त्यांनी सांगितले. संपूर्ण देशभरात अश्याप्रकारे १०८ भिंतींची निर्मिती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.