24.04.2026: कृत्रिम बुद्धिमत्तेला संवेदनशील बनवण्याबाबत चिंतन व्हावे : राज्यपाल जिष्णु देव वर्मा
24.04.2026: आगामी काळात कृत्रिम बुद्धिमत्ता व मशीन लर्निंग विविध क्षेत्रात मोठी भूमिका बजावणार आहे. त्याचे लाभ जसे अनेक आहेत तसेच त्यातून अनेक समस्या देखील निर्माण होऊ शकतात. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेला अधिक संवेदनशील बनवण्याबाबत चिंतन झाले पाहिजे. कृत्रिम बुद्धिमत्तेची व्याप्ती वाढवून समाजाच्या शेवटच्या घटकातील लोकांना घेऊन समावेशी विकास झाला पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज येथे केले. नाविन्यपूर्ण कौशल्याधारित शिक्षणाला चालना देण्यासाठी मुंबई येथील ऍटलास स्किलटेक युनिव्हर्सिटीने सुरु केलेल्या ‘सेंटर फॉर इनोव्हेशन’चे उदघाटन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते संस्थेच्या बीकेसी येथील शैक्षणिक संकुलात झाले. यावेळी ओ पी जिंदल ग्लोबल युनिव्हर्सिटीने ‘सिरील श्रॉफ सेन्टर ऑफ एआय, लॉ अँड रेग्युलेशन’ यांच्या सहकार्याने आयोजित ‘गव्हर्निंग एआय : कायदा, तंत्रज्ञान व समाज’ या विषयावरील चर्चासत्राचे देखील उदघाटन राज्यपालांनी केले. राज्यपालांच्या हस्ते यावेळी ओ.पी. जिंदल ग्लोबल विद्यापीठातर्फे प्रकाशित एआय गव्हर्नन्स अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. ऍटलास स्किलटेक विद्यापीठाच्या संस्थापिका डॉ इंदू शहानी यांनी प्रास्ताविक केले तर ओ.पी. जिंदल ग्लोबल विद्यापीठाचे कुलगुरु सी राज कुमार यांनी ‘गव्हर्निंग एआय’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राची भूमिका विशद केली. कार्यक्रमाला ऍटलास स्किलटेक युनिव्हर्सिटीचे कार्यकारी अध्यक्ष सिद्धार्थ शहानी, कुलगुरु डॉ राजन वेळूकर, सिरील अमरचंद मंगलदास कंपनीचे व्यवस्थापकीय भागीदार सिरील श्रॉफ, अपग्रॅडचे अध्यक्ष रॉनी स्क्रूवाला, विद्यापीठाचे रजिस्ट्रार पराग अमीन, अध्यापक, निमंत्रित व विद्यार्थी उपस्थित होते.