23.04.2026: राज्यपालांची राज्यातील कृषि व पदूम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची व कृषि, पशुविज्ञान विद्यापीठांच्या कुलगुरुंसोबत बैठक
23.04.2026: महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्यातील कृषि व पदूम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तसेच राज्यातील कृषि तसेच पशुविज्ञान विद्यापीठांच्या कुलगुरुंची बैठक संपन्न झाली. यावेळी राज्यपालांनी प्रत्येक कृषि विद्यापीठाला कृषि आधारित इन्क्युबेशन सेंटर तसेच कृषि उत्पादनांवर आधारित ५० स्टार्टअप्स सुरु करण्याच्या सूचना केल्या. विद्यापीठात तयार होणाऱ्या कृषि आधारित उत्पादनांची विक्री व्हावी व त्यातून कृषि स्नातकांना उत्पन्नाचे साधन मिळावे या दृष्टीने स्टार्टअप्सना चालना देण्याची सूचना राज्यपालांनी केली. सुरुवातीला पदूम विभागाचे सचिव डॉ रामास्वामी एन. यांनी पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय याबाबत सादरीकरण करुन पदूम क्षेत्रातील संधी व आव्हाने यांचे विवेचन केले. कृषी आयुक्त सुरज मांढरे, मत्स्य आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील, तसेच राज्यातील चारही कृषी विद्यापीठ व पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू उपस्थित होते. यावेळी पदूम सचिव तसेच कृषि आयुक्तांनी सादरीकरण केले. त्यानंतर नागपूर येथील महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ नितीन पाटील यांनी सादरीकरण केले. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ संजय भावे यांनी यावेळी विद्यापीठाबाबत सादरीकरण केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे कुलगरु डॉ विलास खर्चे, डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाचे कुलगरु डॉ. शरद गडाख, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीचे कुलगरु डॉ. इंद्र मणी यांनी देखील आपापल्या विद्यापीठांचे सादरीकरण केले.