23.03.2026: महाराष्ट्र लोकभवन येथे बिहार राज्य स्थापना दिवस साजरा
23.03.2026: महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र लोकभवन येथे बिहार राज्य स्थापना दिवस साजरा करण्यात आला. यावेळी राज्यपालांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले तसेच बिहारचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल (से.नि.) सय्यद अता हसनैन यांचा संदेश दाखविण्यात आला. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमाचा भाग म्हणून लोकभवनातर्फे बिहार राज्य स्थापना दिनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी बिहारचे राज्यगीत व भोजपुरी गीत सादर केले तसेच मिथिला प्रदेशाचे लोकनृत्य झिझिया व जट-जटिन सादर केले. राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे यांनी प्रास्ताविक केले तर कक्ष अधिकारी वंदना मोरमारे यांनी आभार प्रदर्शन केले. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु प्रो. रविंद्र कुलकर्णी व प्रकुलगुरु प्रिन्सिपल अजय भामरे यांनी राज्यपालांचा सत्कार केला.
कार्यक्रमाला राज्यपालांचे सहसचिव एस राममूर्ती, विद्यापीठाचे कुलसचिव प्रसाद कारंडे, विद्यार्थी विकास संचालक डॉ सुनील पाटील, सांस्कृतिक कार्यक्रमांचे समन्वयक निलेश सावे, विद्यापीठाचे विद्यार्थी तसेच लोकभवन येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.