21.06.2026: राज्यपालांच्या उपस्थितीत मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव संपन्न
21.06.2026: राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत सात दिवसांपासून सुरु असलेला लघुपट, माहितीपट आणि अॅनिमेशन चित्रपटांचा १९ वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (MIFF २०२६) संपन्न झाला. यावेळी राज्यपालांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय प्रवर्गातील उत्कृष्ट ऍनिमेशन फिल्म, उत्कृष्ट लघुपट (कथात्मक) व उत्कृष्ट माहितीपट पुरस्कार प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ चित्रपट निर्माते दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय प्रवर्गातील बेस्ट साउंड, बेस्ट एडिटर व बेस्ट सिनेमॅटोग्राफर पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला माहिती आणि प्रसारण मंत्रालयातील अतिरिक्त सचिव प्रभात कुमार, मंत्रालयातील अतिरिक्त सचिव व वित्तीय सल्लागार दीपक नारायण, नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचे प्रधान महासंचालक धीरेंद्र ओझा, मराठी भाषा व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ किरण कुलकर्णी तसेच राज्यपालांचे सहसचिव एस. राममूर्ती उपस्थित होते.