21.05.2023 : राज्यपालांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार सोहळा संपन्न
21.05.2023 : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे देण्यात येणारे २०२३ वर्षाचे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार’ राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते स्मारकाच्या सभागृहात प्रदान करण्यात आले. हुतात्मा मेजर कौस्तुभ राणे यांना यावेळी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार’ मरणोपरांत प्रदान करण्यात आला. मेजर कौस्तुभ राणे यांच्या आई वीरमाता ज्योती राणे यांनी राज्यपालांकडून हा पुरस्कार स्वीकारला. राज्यपालांच्या हस्ते आयआयटी कानपूरचे संचालक डॉ. अभय करंदीकर यांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर विज्ञान पुरस्कार’ देण्यात आला, तर नागपूर येथील ‘मैत्री परिवार’ या संस्थेला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर समाजसेवा पुरस्कार’ देण्यात आला. प्रदीप परुळेकर यांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती चिन्ह’ पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमाला स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर, अध्यक्ष प्रवीण दीक्षित अध्यक्ष, स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर, विश्वस्त मंजिरी मराठे व स्वप्नील सावरकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.