17.11.2025: राज्यपालांच्या उपस्थितीत राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक राजभवन येथे संपन्न
17.11.2025: महाराष्ट्राचे राज्यपाल तसेच राज्यातील विद्यापीठांचे कुलपती आचार्य देवव्रत यांच्या प्रमुख उपस्थितीत आज राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक राजभवन येथे संपन्न झाली. बैठकीत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) आणि ‘व्हिजन महाराष्ट्र २०४७’ अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, उच्च व तांत्रिक शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी तसेच राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू उपस्थित होते. विद्यापीठे ही विद्या आणि संस्कारांची केंद्रे असावीत. शिक्षक हे विद्यार्थ्यांशी आत्मीयतेने जोडले जावे. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील संवाद व सहकार्य वाढले तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास निश्चित होईल. विद्यार्थ्यांनी खेळ, एनसीसी, एनएसएस यांसारख्या उपक्रमांत सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. तंदुरुस्त शरीर आणि सुदृढ मन हेच चांगल्या शिक्षणाचे आधारस्तंभ आहेत, असे राज्यपालांनी यावेळी बोलताना सांगितले.