14.04.2025: राज्यस्तरीय अग्निशमन सेवा सप्ताहाचा राज्यपालांच्या हस्ते शुभारंभ

14.04.2025: राष्ट्रीय अग्निशमन दिनानिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत आज राज्यस्तरीय अग्निशमन सेवा सप्ताहाचा राजभवन मुंबई येथे शुभारंभ करण्यात आला. मुंबई अग्निशमन दलातील तसेच राज्याच्या इतर महानगर पालिका येथील ८ अग्निशमन अधिकारी व कर्मचाऱ्यांना यावेळी राज्यपालांच्या हस्ते गुणवत्तापूर्ण अग्निशमन सेवेकरिता जाहीर झालेले राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात आले. यावेळी राज्यपालांनी मुंबई अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी रवींद्र अंबुलगेकर, मुंबई अग्निशमन दलाचे उपमुख्य अग्निशमन अधिकारी दीपक घोष, सब ऑफिसर सुनिल गायकवाड, लिडींग फायरमन पराग दळवी, फायरमन तातु परब, पुणे महानगरपालिकेतील फायर इंजिन वाहनचालक करीमखान पठाण, सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेतील फायरमन कसप्पा लक्ष्मण माने व पुणे महानगरपालिकेतील फायर अटेंडण्ट नरसिंहा पटेल यांना राष्ट्रपति पदक प्रदान केले. यावेळी महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालक संतोष वारिक यांनी राज्यपालांच्या पोशाखाला अग्निशमन ध्वजाचे तिकीट लावले. राज्यपालांनी अग्निशमन सेवा कर्मचारी कल्याण निधीला आपले योगदान दिले तसेच जनतेला निधीसाठी अधिकाधिक योगदान देण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला मुंबई अग्निशमन दलाचे, औद्योगिक आस्थापनांचे तसेच महाराष्ट्र अग्निशमन सेवेतील वरिष्ठ अग्निशमन अधिकारी उपस्थित होते. मुंबई डॉकयार्ड येथे सन १९४४ साली झालेल्या जहाजावरील स्फोटात प्राण गमावलेल्या अग्निशमन अधिकारी व जवानांच्या स्मरणार्थ १४ एप्रिल हा दिवस राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिवस पाळला जातो तसेच या दिवसापासून अग्निशमन सप्ताह पाळल्या जातो.