10.06.2026: राज्यपालांच्या हस्ते पुणे येथे ‘तंत्रज्ञान संक्रमण आणि नवोपक्रम गतीवर्धक’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन
10.06.2026: राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पुणे येथे ‘तंत्रज्ञान संक्रमण आणि नवोपक्रम गतीवर्धक’ (Technology Transition and Innovation Accelerator) या विषयावरील आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी कार्यशाळेच्या निमित्ताने तयार केलेल्या ‘ हॅन्डबुक’ चे राज्यपाल आणि इतर मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. उदघाटन सत्राला ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. सुनील भिरूड, कॅनियस इंटरनॅशनलचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद पिंपरकर यांचेसह विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ, संशोधक, उद्योजक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे (सीओईपी) तंत्रज्ञान विद्यापीठ आणि कॅनियस इंटरनॅशनल यांनी संयुक्तरित्या या तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. देशात १.३ लाखांहून अधिक नोंदणीकृत स्टार्टअप्स आणि हजारो संशोधन प्रकल्प सुरू असतानाही त्यांपैकी मोजक्याच नवकल्पना बाजारपेठेपर्यंत पोहोचतात. विद्यापीठे, उद्योग, स्टार्टअप्स, गुंतवणूकदार आणि शासकीय संस्था यांना एकाच व्यासपीठावर आणून संशोधनाचे व्यापारीकरण आणि उद्योगाभिमुख विकासाला चालना देण्यासाठी अशा कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरतील, असे राज्यपालांनी नमूद केले.