09.08.2024: राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत शालेय शिक्षण विभागांतर्गत विविध शैक्षणिक उपक्रमांच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ
09.08.2024: राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शालेय शिक्षण विभागांतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’, महावाचन महोत्सव यांसह विविध शैक्षणिक उपक्रमांच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ राजभवन मुंबई येथे करण्यात आला. जर्मनी येथील बॅडेन – वर्टेम्बर्ग येथे राज्यातील युवकांना कौशल्य प्रशिक्षण व रोजगारासाठी पाठविण्यासाठी झालेल्या करारासंदर्भात बोधचिन्हाचे तसेच क्यूआर कोडचे अनावरण करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्हिडीओ संदेशामार्फत उपस्थितांना संबोधित केले. कार्यक्रमाला शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर, राज्याचे कौशल्य व रोजगार मंत्री मंगलप्रभात लोढा, ग्रामविकास व पंचायत राज, पर्यटन मंत्री गिरीश महाजन, जर्मनीचे मुंबईतील वाणिज्य दूत एकिम फेबिग, शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव इदझेस कुंदन, अधिकारी तसेच प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी व निमंत्रित यावेळी उपस्थित होते. शालेय शिक्षण विभाग व गोथं इन्स्टिट्यूट यांच्यात युवकांना जर्मन भाषा शिकविण्याबाबत करारांचे आदानप्रदान करण्यात आले, तसेच बृहन्महाराष्ट्र मंडळ अमेरिकेशी तेथील मुलांना मराठी शिकविण्याबाबत झालेल्या सुधारित करारांचे हस्तांतरण करण्यात आले. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा २, महावाचन महोत्सव टप्पा २, माझी शाळा माझी परसबाग टप्पा २ व जर्मनीस कुशल मनुष्यबळ पुरविण्याबाबत प्रकल्प यांचा शुभारंभ करण्यात आला.