07.05.2026 : व्हिएतनाम राष्ट्राध्यक्षांचे राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
07.05.2026 : व्हिएतनाम समाजवादी प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष व महासचिव तो लम तसेच त्यांचेसोबत आलेल्या मंत्रीस्तरीय शिष्टमंडळाच्या सन्मानार्थ राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी लोकभवन मुंबई येथे स्वागत समारंभ व स्नेह भोजनाचे आयोजन केले. स्वागत समारोहाला राज्यपालांच्या पत्नी सुधा देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अमृता फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांसह व्हिएतनाम देशाचे वरिष्ठ मंत्री तसेच राज्यातील निमंत्रित मान्यवर उपस्थित होते. गेल्या काही वर्षात भारतातून व्हिएतनामला येणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षणीय वाढली असून मुंबई हे शहर व्हिएतनाम करिता ‘गेट वे’ सिद्ध झाले असल्याचे राष्ट्राध्यक्ष तो लम यांनी सांगितले. आगामी काळात भारताशी विज्ञान, तंत्रज्ञान, स्टार्टअप व इन्क्युबेशन क्षेत्रात सहकार्य वाढविण्यास व्हिएतनाम उत्सुक असल्याचे राष्ट्राध्यक्ष तो लम यांनी यावेळी सांगितले. मुंबई व हो चि मिन्ह शहर या महानगरांमध्ये बरीच साम्यस्थळे असून उभय शहरांमधील भगिनी शहर सहकार्य अधिक वाढवले जाईल असे त्यांनी सांगितले. सन १९५८ साली व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष हो चि मिन्ह हे मुंबईला आले होते व त्यांचे स्वागत याच लोकभवनात करण्यात आले होते असे सांगून राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी राष्ट्राध्यक्षांना हो चि मिन्ह यांच्या लोकभवनात झालेल्या त्या ऐतिहासिक भेटीच्या छायाचित्राची फोटो फ्रेम भेट दिली. स्वागत समारोहाला विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, विधान सभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, मुंबईच्या महापौर रितू तावडे, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते, मुंबईच्या महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, पोलीस आयुक्त देवेन भरती व इतर मान्यवर देखील उपस्थित होते. पॉलिटब्यूरोचे सदस्य असलेले व्हिएतनामचे राष्ट्रीय सुरक्षा मंत्री, सार्वजनिक सुरक्षा मंत्री, परराष्ट्र मंत्री, वित्त मंत्री, विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री, आरोग्य मंत्री व उद्योग व्यापार मंत्री हे देखील स्वागत समारंभाला उपस्थित होते.