07.02.2024: राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ संपन्न
07.02.2024: मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठाच्या सर कावसजी जहांगीर दीक्षान्त सभागृहात संपन्न झाला. दीक्षान्त समारंभाला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष प्रा. एम. जगदीश कुमार, कुलगुरु प्रा. रविंद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव प्रा. बळीराम गायकवाड व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थित होते. दीक्षान्त समारंभामध्ये १ लाख ५१ हजार ६४८ स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. विविध विद्याशाखेतील ४२८ स्नातकांना विद्यावाचस्पती (पीएच.डी) पदवी प्रदान करण्यात आली. विविध परीक्षांमध्ये प्राविण्य संपादन केलेल्या २१ विद्यार्थ्यांना २४ पदके प्रदान करण्यात आली. यंदा पद्म भूषण पुरस्कार जाहीर झालेले उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक व पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेले डॉ झहीर काझी व उदय देशपांडे हे विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते.