07.01.2026: राज्यपालांनी राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी निवड झालेल्या तरुणांशी दुरस्थ माध्यमातून संवाद साधला
07.01.2026: केंद्र सरकारच्या क्रीडा व युवा मंत्रालयातर्फे आयोजित राष्ट्रीय युवा महोत्सव-विकसित भारत यंग लिडरर्स डायलॉग २०२५-२६ या राष्ट्रीय कार्यक्रमासाठी महाराष्ट्र व गुजरात राज्यांमधून निवड झालेल्या युवक-युवतींशी राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची व मोलाची आहे. देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी युवकांनी विचार, कृती आणि नवीन प्रतिभेच्या माध्यमातून पुढे येऊन भारतीय संस्कृतीचा वारसा जपत भारताला विकसित विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत आपले योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले. यावेळी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या राज्यस्तरीय कार्यक्रमाला क्रीडा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, राज्यपालांचे सहसचिव एस राममूर्ती, उपसचिव सुनील पांढरे, सहाय्यक संचालक मिलिंद दीक्षित, मुंबई विभागाच्या क्रीडा उपसंचालक सुवर्णा बारटक्के व स्पर्धेसाठी निवड झालेले विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी उपस्थित युवकांना प्रतिनिधिक स्वरूपात सन्मानित करण्यात आले. दिनांक ९ ते १२ जानेवारी २०२६ रोजी नवी दिल्ली येथे होत असलेल्या या कार्यक्रमासाठी राज्यातून निवड झालेल्या ७९ युवक युवतींना आज राज्यपालांच्या मार्गदर्शनानंतर दिल्लीकडे प्रस्थान करण्यासाठी निरोप देण्यात आला.