05.07.2026 : राज्यपालांच्या हस्ते पुणे येथे एसएनडीटी महिला विद्यापीठात भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पुतळ्याचे अनावरण
05.07.2026 : महाराष्ट्राचे राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते पुणे येथील एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या परिसरात थोर शिक्षणतज्ज्ञ व समाजसुधारक भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. महर्षी कर्वे यांनी सन १९१६ साली स्थापन केलेल्या एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या १११ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हा समारंभ संपन्न झाला. यावेळी राज्यपालांनी महर्षी कर्वे कुटीरला भेट देऊन तेथील स्मृतीस्थळाचे अवलोकन केले. यावेळी विद्यापीठातर्फे आयोजित ‘इनोव्हेशन महाकुंभ २.०’ अंतर्गत आयोजित प्रदर्शनालाही राज्यपालांनी भेट देऊन विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती घेतली.
यावेळी राज्यपालांच्या हस्ते सर्वोत्तम महाविद्यालय, सर्वोत्तम शिक्षक, सर्वोत्तम शिक्षकेतर कर्मचारी, सर्वोत्तम एनसीसी कॅडेट, सर्वोत्तम माजी विद्यार्थी व महर्षी कर्वे खेलरत्न पुरस्कार विजेते यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, राज्यसभा सदस्य डॉ. मेधा कुलकर्णी, विद्यापीठाच्या कुलगुरु प्रा. उज्ज्वला चक्रदेव, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे तसेच विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. विलास नंदवडेकर उपस्थित होते.