05.06.2026: राज्यपालांच्या उपस्थितीत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न
05.06.2026:जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भामला फाउंडेशन व्दारे आयोजित कार्यक्रम महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत वांद्रे, मुंबई येथे संपन्न झाला. यावेळी राज्यपालांच्या हस्ते पर्यावरण हितासाठी योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना ‘एन्व्हायरमेंट लीडरशिप’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते देशव्यापी पर्यावरण जागृती मोहीम आणि भूमी नमस्कार या गीताचा शुभारंभ करण्यात आला. हवामान कृती आणि शाश्वत विकासासाठी सामूहिक प्रयत्नांची तातडीची गरज असून आर्थिक विकास आणि पर्यावरण संरक्षण हे परस्परविरोधी नसून परस्परपूरक आहेत, असे राज्यपालांनी सांगितले. राज्यपालांनी “भूमी नमस्कार” या गीताच्या निर्मिती चमूचे अभिनंदन केले. हे गीत प्रसून जोशी यांनी लिहिले असून आर. बाल्की यांनी दिग्दर्शित केले आहे. या कार्यक्रमाला गौऱ गोपाल दास, लक्ष्यराज सिंह मेवाड, विकास खन्ना, विजय कारिया, सुजित पाटील, सीमा सिंह, हिमेश रेशमिया, अभिनेते मलायका अरोरा, सोनू सूद व वेदांग रैना तसेच पर्यावरणप्रेमी व मान्यवर उपस्थित होते.