04.08.2022 : राज्यपालांच्या हस्ते नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी शतकोत्तर महोत्सवाचे उद्घाटन
04.08.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या स्थापनेच्या शतकी महोत्सवाचे उदघाटन नागपूर येथे संपन्न झाले. यावेळी विद्यापीठाच्या ‘शतदीप पर्व’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाला अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष तसेच होमी भाभा राष्ट्रीय संस्थेचे कुलपती डॉ अनिल काकोडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ सुभाष चौधरी, प्रकुलगुरु डॉ संजय दुधे, कुलसचिव राजू हिवसे, लोकप्रतिनिधी तसेच निमंत्रित मान्यवर, शिक्षक तसेच माजी – आजी विद्यार्थी उपस्थित होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शताब्दी निमित्त विद्यापीठाला दिलेला व्हिडीओ संदेश यावेळी दाखविण्यात आला.
राज्यपालांच्या हस्ते यावेळी अजंता फार्मा व समता फाउंडेशनचे संस्थापक पुरुषोत्तम अगरवाल यांना त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘जीवन साधना’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आपल्या गौरवशाली शतकी वाटचालीत विद्यापीठाने देशाला अनेक नामवंत विद्यार्थी दिले. त्यांचे उदाहरण डोळ्यांपुढे ठेवून विद्यापीठाने भविष्यासाठी आराखडा तयार करावा व त्याच्या कार्यान्वयनासाठी एकनिष्ठेने व मिशनरी उत्साहाने काम करावे. भारताला ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्यासाठी विद्यार्थ्यांसह समाजातील सर्व घटकांचे योगदानआवश्यक आहे, असे राज्यपालांनी सांगितले.
नव्या शैक्षणिक धोरणात नीतिमूल्यांना महत्व देण्यात आल्याचे सांगून चारित्र्यसंपन्न युवक घडविल्यास विद्यापीठातून डॉ अनिल काकोडकर व पुरुषोत्तम अगरवाल यांसारखे प्रतिभावंत विद्यार्थी तयार होतील असे त्यांनी सांगितले. राज्यपालांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे प्रसिद्ध भजन उद्धृत करून जातिभेद रहित समाज निर्मितीसाठी कटिबद्ध होण्याचे आवाहन यावेळी केले.
सर्वात श्रेष्ठ देशांच्या यादीत भारताला स्थान मिळवून देण्यासाठी विद्यापीठाने महत्वाची भूमिका निभवावी असे सांगताना अमेरीकेतील जागतिक दर्जाच्या विद्यापीठांमुळे अमेरिका जगात महत्वाचा देश झाला आहे, असे डॉ अनिल काकोडकर यांनी सांगितले. ग्रामीण भागातील युवकांना सक्षम करुन विद्यापीठाने शहरी – ग्रामीण तफावत कमी करण्याचा प्रयत्न करावा असे त्यांनी सांगितले.