04.04.2025: महाराष्ट्र राजभवन येथे राजस्थान आणि ओडिशा राज्य स्थापना दिन साजरा

04.04.2025: महाराष्ट्राचे राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत आज राजस्थान आणि ओडिशा या दोन राज्यांचा राज्य स्थापना दिवस राजभवन मुंबई येथे संयुक्तपणे साजरा करण्यात आला. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, सातारा यांच्या सहकार्याने महाराष्ट्र राजभवनातर्फे या राज्य स्थापना दिवसाचे आयोजन करण्यात आले. भारत सरकारच्या ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमाचा भाग म्हणून राज्य स्थापना दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी दोन्ही राज्यांचा इतिहास, सौंदर्य, वारसा, कला संस्कृती आणि पर्यटन स्थळे दर्शविणारे लघुपट दाखवण्यात आले. यावेळी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी राजस्थानी लोकगीते केसरिया आणि झिरमीर बरसे आणि लोकनृत्य चिरामी, घूमर आणि कालबेलिया सादर केले तसेच ओडिशातील लोकगीते संबलपुरी गीत- ‘रसरकेली बो’ आणि लोकनृत्य – संभलपुरी ढलकाई सादर करण्यात आले. कार्यक्रमाला माजी खासदार रामशेठ ठाकूर, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे प्रोव्होस्ट चंद्रकांत दळवी, कुलगुरु डॉ. ज्ञानदेव म्हस्के, राज्यपालांचे उपसचिव एस राममूर्ती तसेच विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. राज्यपालांच्या हस्ते यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे प्रोव्होस्ट चंद्रकांत दळवी तसेच विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.