03.06.2026: राज्यपालांच्या उपस्थितीत महाराष्ट्र लोकभवन येथे तेलंगणा राज्य स्थापना दिवस साजरा
03.06.2026: राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज महाराष्ट्र लोकभवन येथे तेलंगणा राज्य स्थापना दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. ‘वर्मा फाउंडेशन’ आणि ‘फेडरेशन ऑफ तेलगू असोसिएशन ऑफ महाराष्ट्र’ (F-TAM) यांच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमात संस्थेतील काही कलाकारांनी लोकगीते लोकनृत्यासह सादर केली. विविध राज्यांमध्ये राज्य स्थापना दिवस साजरे केल्यामुळे त्या त्या राज्यांच्या संस्कृती व परंपरेचे दर्शन होते व त्यातून राष्ट्रीय एकात्मता बळकट होते असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी यावेळी केले. कार्यक्रमाला राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाचे (NCLT) माजी न्यायिक सदस्य न्यायमूर्ती (निवृत्त) मदन गोसावी, सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा, वर्मा फाउंडेशनचे अध्यक्ष पी. यू. एन. वर्मा, ‘मराठी-तेलगू मंच’चे संस्थापक आणि ‘फेडरेशन ऑफ तेलगू असोसिएशन ऑफ महाराष्ट्र’चे अध्यक्ष जगन बाबू गंजी, राज्यपालांचे सहसचिव एस. राममूर्ती, राज्यपालांचे परिवार प्रबंधक डॉ. निशिकांत देशपांडे, नेल्लोर येथील ‘नाट्यशिरोमणी’ शेख नादिया, तसेच तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील विविध संस्थांचे सदस्य उपस्थित होते.