03.03.2023 : राज्यपालांच्या उपस्थितीत कुटुंब मिशन आणि सर्वांगीण ग्रामसमृद्धी योजनेचा शुभारंभ संपन्न
03.03.2023 : राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र आणि शासनाच्या १७ विभागांच्या योजनांचे अभिसरण करून तयार करण्यात आलेल्या सुविधा संपन्न कुटुंब मिशन आणि सर्वांगीण ग्रामसमृद्धी योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यशवंतराव चव्हाण सभागृह, मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रोहयो आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, आमदार आशिष जयस्वाल आणि महेंद्र दळवी, शासनाचे अपर मुख्य सचिव नंद कुमार, मनरेगा आयुक्त शंतनू गोयल, लोकप्रतिनिधी तसेच राज्याच्या विविध जिल्ह्यांमधून आलेले अधिकारी उपस्थित होते. यावेळी राज्यपाल व मुख्यमंत्र्यांच्या राज्याच्या विविध भागांमधील कार्यक्षम अधिकारी – कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रोजगार हमी योजना विभागाच्या संकेतस्थळाचे उदघाटन करण्यात आले तर फलोत्पादनची मागणी ऑनलाईन करण्याकरिता तयार करण्यात आलेल्या मोबाईल ॲप्लिकेशनचे उदघाटन संदीपान भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महात्मा गांधी नरेगा केंद्र महाराष्ट्र – माहिती आणि तक्रार निवारण टोल फ्री क्रमांकाचे तसेच यशोगाथा या स्मरणिकेचे व यशोगाथा व्हिडीओ मालिकेचे देखील उदघाटन करण्यात आले.